हॅलो कृषी ऑनलाईन :राज्यात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. खरीप पिकांची कापणी अनेक भागात सुरु आहे. आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत ते रब्बी हंगामाचे…रब्बी हंगामात घेतले जाणारे मुख्य पीक म्हणजे हरभरा होय आजच्या लेखात हरभऱ्याची लागवड आणि वाण यांच्याविषयी माहिती घेऊया. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी हरभरा लागवड तंत्राविषयी पुढील माहिती दिली आहे.
जमीन
हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी, काळी, कसदार चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. क्षारयुक्त जमीनीवर हरभऱ्याची लागवड करु नये. खरीपाचे पीक घेतल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हरभरा पिकाला कोरडे व थंड हवामान मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची अजिबात सोय नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २० सप्टेंबर नंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण वापरावेत.
पेरणी
बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. पेरणीची वेळ टाळल्यास किंवा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पन्न फार कमी मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.
सुधारित वाण कोणते वापरावे ?
– विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विक्रांत हे वाढ मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहे.
– काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पिकेव्ही -२, पिकेव्ही – ४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत.
– फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे. विशाल हा टपोऱ्या दाण्याचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नविन वाण यांत्रिक पद्धतीने काढण्याकरिता प्रसारित केला आहे.
सामान्यतः देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तीफणीने करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेंटीमीटर व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेऊन टोकन होईल असे ट्रॅक्टर वर चालणारे पेरणी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केले आहे. त्याचा वापर करणे फायदेशीर आहे. या प्रकारे पेरणी केल्यास विजय व फुले विक्रम हरभऱ्याचे हेक्टरी ६५ ते ७० किलो तर विशाल, विजय, विराट किंवा पीकेव्ही २ या वाणांचे एकरी शंभर किलो बियाणे लागते. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. भारी जमिनीत ९० सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सेंटिमीटर अंतरावर एक एक बियाणे टोकावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वाफशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते.