अचानक पाण्याचा लोंढा आला, तब्बल 700 पोती आले ट्रॅक्टरसह वाहून गेले ; शेतकऱ्यांचे 20 लाखांचे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील पेरले येथे अचानक नदीला पाणी आल्यामुळे तब्बल ७०० पोती आले व ट्रॅक्टर तारळी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील पेरले येथील विक्रम सिंह गुलाबराव कदम व युवराज लक्ष्मण जाधव हे आपल्या शेतातील तब्बल सातशे ते आठशे पोती आले ट्रॅक्टर मध्ये भरून तारळी नदीत धुण्यासाठी गेले होते.

शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते तारळी नदीत गेले होते त्यावेळी नदीत पाणी कमी असल्याने ट्रॅक्टर पाण्यात उभा करून ते आले धुत होते दरम्यान याचवेळी अचानक जोरात पाऊस पडल्याने तारळी नदीत पाण्याचा लोंढा आला आणि पाणी वाढले यामुळे आल्यासह ट्रॅक्टर पाण्यात बुडाला व यामधील सुमारे आठशे पोती म्हणजेच एकूण सुमारे 30 हजार किलो आले वाहून गेले. यामुळे विक्रम सिंह कदम व युवराज जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यामध्ये विक्रम सिंह कदम यांची आले भरलेली सहाशे पोती तर युवराज जाधव यांची सुमारे 100 पोती होती..

या शेतकऱ्यांसह लोकांनी वाहून जाणारे आले वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांना यश आले नाही दरम्यान पाण्याची पातळी अद्यापही जास्त असल्याने जॉन डीअर ट्रॅक्टर व ट्रॉली अद्यापही नदीपात्रातच आहे. अचानक लोंढा आल्याने आल्यासह ट्रॅक्टर बुडाला ही घटना गावात समजतात पेरले पुलावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *