शेवटच्या टप्प्यात असे करा सोयाबीन पिकावरील किड आणि रोग व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत, अशा अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्री भुंगा,खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी ( स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या पंतगवर्गिय किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर काही ठिकाणी केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. या किडींचे वेळीच व्यवस्थापन नाही केल्यास सोयाबीन उत्पन्नात मोठे नुकसान होऊ शकते. त्यासोबतच पावसाचा खंड पडल्याने पिकास पाण्याचा ताण बसत आहे.

त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वर रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामध्ये प्रादुर्भाव झालेली पाने सुरुवातीला पाण्यात भिजल्या प्रमाणे दिसतात त्यानंतर लवकरच हिरवट-तपकिरी ते लालसर-तपकिरी होतात. संक्रमित भाग नंतर तपकिरी किंवा काळ्या रंगाचा होतो. जास्त पाऊस किंवा जास्त दमट परिस्थितीत, बुरशीच्या मायसेलियल वाढीप्रमाणे पानांवर जाळी तयार होते. पानांवर गडद तपकिरी स्क्लेरोशिया तयार होतात. रिमझिम पावसामध्ये या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन उत्पन्नात घट येऊ शकते त्यामुळे वेळीच उपायोजना करणे आवश्यक आहे

तसेच मागिल काही वर्षांच्या अनुभवावरून असे लक्षात येते की येणाऱ्या काळात शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन खालील प्रमाणे कीड व रोगांचे व्यवस्थापन करावे.

कीड आणि रोगांचे व्यवस्थापन

किडीकरीता 

क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % – ६० मिली प्रती एकर किंवा थायमिथोक्झाम १२.६%+ लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५% (पूर्वमिश्रित कीटकनाशक) – ५० मिली प्रती एकर किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ % + लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ %- ८० मिली प्रती एकर (पूर्वमिश्रित कीटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८% – १०० ते १२० मिली प्रती एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ % + इमिडाक्लोप्रीड १९.८१ % (पूर्वमिश्रित कीटकनाशक) -१४० मिली प्रती एकर यापैकी कुठलेही एक कीटकनाशक फवारावे.

See also  महज ₹20,000 डाउनपेमेंट पर अपने घर ले जाएं Ather Electric Scooter, मिलेगी 200Km की रेंज..

वरील कीटकनाशक सर्व प्रकारच्या किडी (खोडकीडी आणि पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात.
म्हणून किडीनुसार वेगळे-वेगळे कीटकनाशक फवारण्याची आवश्यकता नाही.

पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट,शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाकरीता

टेब्युकोनॅझोल १०%+ सल्फर ६५ % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – ५०० ग्रॅम प्रति एकर किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ % -२५० मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन २०% – १५० ते २०० ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३ %+ इपिक्साकोनाझोल ५ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -३०० मिली प्रति एकर फवारावे.

पिवळ्या मोझॅक रोगाकरिता प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून बांधावर न टाकता नष्ट करावीत आणि रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी किडीचे व्यवस्थापन करावे

पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे तसेच कोरडवाहू सोयाबीनला अवर्षणप्रवण परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:००:४५ खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी करताना पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही

किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी .

डॉ.के.टी.आपेट
वनस्पती रोगशास्त्र विभाग
डॉ.जी.डी.गडदे आणि डॉ.डी.डी.पटाईत
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००

Leave a Comment