हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांना होणाऱ्या लंपी या साथीच्या रोगाचा फैलाव राज्यात वेगाने होत आहे. महाराष्ट्रात या रोगाचा होणार फैलाव बघता प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाबाबत मोठी घोषणा केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासोबत, लम्पी स्कीन आजारांमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
टास्क फोर्सची स्थापना
राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांमध्ये या रोगाचा फैलाव झाला आहे. राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आील आहे. लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे टास्क फोर्स करणार आहे.
जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर
दरम्यान, औरंगाबादमधील विनोद पाटील यांनी लम्पी स्कीन आजाराचा धोका ओळखून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. याचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी काल (१६) क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे. त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे.