हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भ मराठवाड्यासह काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
१) कापूस : पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे.
२)तूर : पाऊस झाल्यानंतर तूर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
३) भुईमूग : भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत रब्बी भुईमूग पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.
४)मका : मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी.
५)रब्बी ज्वारी : रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते.
६) रब्बी सूर्यफूल : रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.