राज्यातील ‘हा’ साखर कारखाना देणार एकरकमी FRP

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापुरातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी हंगामासाठी कारखान्याच्या परंपरेनुसार एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व श्रीदत्त साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सभासदांच्या विश्वासास पात्र राहून आणि कामगारांच्या पाठबळावर दत्त साखर कारखान्याने चौफेर प्रगती साधली आहे. यावर्षी कारखान्याकडे पुरेसा ऊस उपलब्ध होणार असून यंदाचा गळीत हंगामात जादा क्षमतेने गाळप करण्याचा मानस आहे. ते म्हणाले, की केंद्र शासनाने हंगामापूर्वी साखर निर्यातीबाबतचे धोरण जाहीर करणे आवश्यक आहे,वार्षिक सभेत कारखान्याचा शेअर १० हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करण्याच्या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले, साखरेला केंद्र शासनाने प्रति क्विंटल तीन हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत ठरवावी. कारखाना कार्यक्षेत्रातील १९ गावांमधील क्षारमुक्त प्रकल्प राबविण्यात आला असून यामध्ये तीन हजार एकर जमीन टिकाऊ झाली आहे. क्षारमुक्त प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना एकरी २४ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. ऊर्जांकूर प्रकल्प हा लवकरच कर्जमुक्त होणार असून तो कारखान्याच्या मालकीचा झाल्यानंतर ऊस उत्पादक सभासदांना त्याचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. त्याचबरोबर या सभेत सभासदांनी विचारलेल्या लेखी स्वरूपातील प्रश्नांना व्यवस्थापनाने उत्तरे दिली. व्हाइस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलराव यादव यांच्यासह संचालक उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *