हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर व परभणी तालुक्यातील ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली .यावेळी पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत पाथरी तालुक्यात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीनंतर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा व आर्थिक मदत द्यावी अशी लेखी स्वरूपात मागणी केली .
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवार 27 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी केली व त्यानंतर ते हिंगोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार होते .तत्पूर्वी सायंकाळ उशिरा त्यांनी परभणी जिल्ह्यातील नुकसानी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आढावा बैठक घेतली यानंतर पत्रकारांशी संवाद साधला .
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये खरीप पिके काढणीच्या वेळी अतिवृष्टीचा व सततचा पाऊस झाल्यामुळे पाथरी तालुक्यातील चारही महसूल मंडळातील खरीप पिकांचे 80 टक्कांपेक्षा जास्त नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्या असल्याचे लेखी निवेदनातून निदर्शनास आणून दिले. दरम्यान 15 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर पर्यंत सलग सहा दिवस उपोषण व आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने 25 ऑक्टोबर पर्यंत पंचनामे करत अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भातही शिष्टमंडळाने राज्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्यात येईल परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 63 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यात येऊन सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल कुणीही वंचित राहणार नाही असा यावेळी शिष्टमंडळाला शब्द दिला.
दरम्यान पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांना दिला आहे. शिष्टमंडळात श्याम धर्मे , डॉ . महेश कोल्हे , अमोल भाले पाटील ,संदीप टेंगसे ,गजानन घुंबरे , दिपक टेंगसे यांचा सहभाग होता .