हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने कुठे गोगलगायींचा तर कुठे पैसा किडा म्हणजेच वाणी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे वावरातले सोयाबीन, कापूस, मका, उडीद, तूर आदि पिकांचे नुकसान होत आहे. आजच्या लेखात आपण या किडींचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने सुचविलेल्या पुढील उपाययोजनांचा अवलंब या किडिंच्या नियंत्रणासाठी करावा.
पैसा किडा म्हणजेच मिलीपेड्स हे निशाचर असुन सामान्यतः सडणारी पाने, कुजलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या वनस्पती खातात. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारी आहे. परंतु जेव्हा ते असंख्य होतात तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणा-या रोपटे, बियाणे जसे कापूस, सोयाबिन या सारख्या पिकाचे नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कापून टाकतात कालांतराने रोपावर जाउन पाने कुरतडतात.
व्यवस्थापन कसे करावे ?
–शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करुन बांधावरिल गवत, दगड, जमिनीवर ठेवलेल्या वस्तू काढाव्यात.
–ब-याचदा आर्द्र, घनदाट पिकात जास्त पाणी दिल्यामुळे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास मिलीपेड्सचा प्रादुर्भाव वाढतो.
–शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले पदार्थ गोळा करुन नष्ट करावेत.
— रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले मिलीपेड्स जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत.
–जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच मिलीपेड्स मरतात.
–ज्याठिकाणी शेतक-यांनी पेरणीपुर्वी बियाण्याला बिजप्रक्रीया केली आहे तेथे प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.
–पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या पैसा किडी उघडया पडून नष्ट होतील.
–चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते.
रासायनिक नियंत्रण
१) किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ३ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन (५ टक्के एसपी) १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. सदर कीडनाशकाची शिफारस मिलीपेड साठी नाही, मात्र कापूस पिकामध्ये आहे.
२)कार्बोसल्फान (६ टक्के दानेदार) किंवा क्लोरपायरीफॉस (१० टक्के दानेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्के) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरावे. सदरील कीटकनाशके परिणामकारक आहेत परंतु लेबल क्लेम नाहीत.