हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी एक कौतुकास्पद उपक्रम जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील ‘समृद्धी’ साखर कारखान्यानं घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला साखर कारखान्याकडून एक क्विंटल साखर फुकट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम तालुक्यातील सर्व सभासद शेतकऱ्यांकरीता असून शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आता 100 किलो साखर घरपोच मिळणार आहे. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांच्या मध्ये आनंद आहे. हा महत्वपूर्ण निर्णय समृद्धी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
येणाऱ्या हंगामापासून ही मदत केली जाणार असल्याचे कारखान्याचे संचालक सतीश घाटगे यांनी सांगितले. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे काही देणं लागतो, याच भावनेतून कारखान्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे संचालक सतीश घाटगे यांनी दिली आहे. 100 किलो देण्यात येणारी साखर ही शेतकऱ्यांच्या घरी पोहोच करण्यात येणार आहे. तर बाकीच्या ऊस उत्पादक सभासदांना 50 किलो साखर घरपोच देण्याचा निर्णय कारखान्यानं घेतला असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले.
दरम्यान , मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. यंदाच्या हंगामात 203 सहकारी आणि खासगी साखर कारखाने सुरु होणार आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड क्षेत्र सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर आहे. यंदा 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.