हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात हवामान अतिशय लहरी राहिले. या लहरी हवामानामुळे मात्र पिकांवर रोग आणि किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वारंवार फवारण्या करूनही अपेक्षित उत्पादन न आल्यामुळे लातूर येथील औसा तालुक्यातील उजनी येथील शेतकऱ्याने चार एकरावरील सोयाबीन वर रविवारी रोटाव्हेटर फिरवले.
अनियमित पाऊस आणि किडींचा हल्ला
जुलै महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची समाधानकारक वाढ झाली नाही. पिके पिवळी पडली. त्यात गोगलगायीने पिकावर केलेला हल्ला त्यासोबतच खोडअळी, हळद्या आदींसारख्या संकटामुळे सोयाबीन पिकाचे या वेळी मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातीला जून महिन्यात पावसाचा खंड पडला. जुलै महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे या महिन्यात चार एकरांवर सोयाबीन पिकाची पेरणी केली. परंतु या महिन्यात सुरू झालेला संततधार पाऊस ऑगस्ट महिन्यापर्यंत थांबलाच नाही. परिणामी, पावसाने उघडीप न दिल्यामुळे नुकतीच उगवण झालेल्या कोवळ्या पिकांना हा पाऊस सोसला नाही आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले.
सततच्या ओलीमुळे पिकांची वाढ झाली नाही. पिके पिवळी पडली. त्यानंतर आश्चर्यकारकपणे गोगलगायीने पिकावर हल्ला केला आणि बहुतांश पीक त्यांनी फस्त केले. एवढेच नाही तर उर्वरित पिकावर खोडअळी, हळद्या यांसारख्या रोगांची लागण झाली. या पार्श्वभूमीवर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याने वैतागून शेतकरी संतोष ढासले यांनी चार एकर वरील सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट केले.