सायेब…अनुदानाचं पैकं लवकर द्या, मग आई दिवाळीला पोळ्या करेल…शेतकऱ्याच्या चिमुकल्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र एकदा वाचाच

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी शेतमालाला दर नाही, कधी नैसर्गिक आपत्तीमुळे हातचं पीक वाया जातं शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती… शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि व्यथा सांगणारं एका चिमुकल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिंगोलीच्या एका शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरानं हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.

काय आहे पत्रात ?

” एकनाथ शिंदे
मंत्री सायेब, मुंबई

माझे बाबा शेती करतात आमच्या घरी शेती कमी आहे. असे बाबा म्हणतात मी बाबाले म्हणलं की मले गुपचूप खायला पैसे द्या की, माह्या संग भांडण करतात. म्हणतात यावर्षी सगळी सोयाबीन गेली वावर इकतो देतो तुला दहा रुपये… आईने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथं इख खायला पैसे नाहीत वावरातली सोयाबीन गेली. महे बाबा दुसऱ्याच्यात कामाला जातात मी आईला म्हटलं. दिवाळीला पोळ्या कर ती म्हणे की बँकेत अनुदान आलं की करू पोळ्या….

साहेब आमच्या घरी सणाला पोळ्यालाबी गुपचूप ले पैसे नाहीत आम्हाला घर नाही. आम्हाले काहीच नाही. मी बाबा संग भांडण केलं की ती आई म्हणे आपल्या जवळच्या गावात शेतकऱ्याच्या पोराने पैसे मागितले म्हणून फाशी घेतली आता मी बाबाले पैसे नाही मागत…

साहेब आमचं घर पहा की, तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या मग दिवाळीला आई पोळ्या करते. तुम्ही या पोळ्या खायले साहेब…

तुमचा आणि बाबा चा लाडका,”
प्रताप कावरथे वर्ग सहावा,
जिल्हा परिषद शाळा गोरेगाव हिंगोली…

अशा आशयाचे हे पत्र मुख्यमंत्र्यांना या चिमुकल्याने लिहले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे मंत्री राजकारणात व्यस्त असताना शेतकऱ्याची खरी व्यथा जाणून या चिमुकल्याच्या घरी दिवाळीला पोळ्या बनतील का ? शेतकऱ्याला अनुदान मिळेल का ? शेतकऱयांचे प्रश्न मार्गी लागतील का ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

See also  राष्ट्रीय राजपूत करणी सेना ने बीमा भारती का पुतला दहन किया

 

Leave a Comment