हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सचिवांना शिवीगाळ केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एमआयडीसी) मध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क आणि उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण उद्योग उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भात सिल्लोडचे आमदार तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. सिल्लोड परिसरात एमआयडीसी सुरु करायची आहे. या प्रस्तावित एमआयडीसीच्या निम्म्या क्षेत्रात कृषी औद्योगिक पार्क (ॲग्रो इंडस्ट्री पार्क) उभारल्यास कृषी अन्न प्रकिया उद्योगांना चालना मिळेल. तसेच उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वापरल्यास औद्योगिक समतोल राखता येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
याबाबत बोलतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्यात रोजगारासाठी उद्योग उभारणे आणि त्यांना चालना देण्याची गरज आहे. सिल्लोड परिसर हा डोंगरी भाग असून रस्ते, मुबलक पाणी अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. सिल्लोड हा तीन जिल्ह्यांच्या मध्यभागी असल्याने वाहतूक व्यवस्थासुद्धा उपलब्ध आहे. येत्या काळात कृषी प्रक्रिया उद्योजक आणि इतर कंपन्यांना उद्योग उभारण्याबाबत आवाहन करणार असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.
आमच्या आमदारांची कामे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात होत नसल्याने आम्ही बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा सतत शिंदे गटाचे आमदार करतात. त्यामुळे आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये आपले प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी शिंदे गटाचे सर्वच आमदार प्रयत्न करत आहे. दरम्यान अशाच काही प्रलंबित विकास कामांच्या मुद्यावरून अब्दुल सत्तार यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सचिवांना शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. तर या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील प्रलंबित एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
संदर्भ : एबीपी माझा