पुणे जिल्ह्यानंतर ‘या’ जिल्ह्यातील 109 जनावरांना ‘लंपी’ ची लागण

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान, गुजरात राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या लंपी या जनावरांतील त्वचा रोगाने राज्यात सुद्धा हात पाय पसरायला सुरुवाट केली आहे. सुरवातीला पुण्यातील जुन्नर येथील पशुधनाला या रोगाची बाधा झाली होती. आता अकोला जिल्ह्यात देखील या रोगाने शिरकाव केला आहे.

अकोल्यातील मौजे निपाणा (ता. अकोला), तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यात जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १०९ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून, त्वचेचे खरड व रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, निपाणा येथील एका जनावरामध्ये ‘लम्पी’ या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवाल तपासणीनंतर सकारात्मक आला आहे. या रोगाचा प्रसार अन्य जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार संसर्गकेंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

आजाराची माहिती देण्यासाठी टोल फ्री नंबर जारी

या रोगाचा फैलाव वाढल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज झाली असून पशुपालकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आजारासंबंधी माहिती देण्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला आहे. यावर पशुपालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *