बीड जिल्ह्यात गोगलगायींनंतर आता घोणस अळीचे संकट ; परिणाम केवळ पिकांवर नाही तर शेतकऱ्यांवर सुद्धा

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाल्यानंतर बीड जिल्ह्यात गोगलगायींच्या प्रदूरभावामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आणखी एक नवे संकट बीड मधल्या शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आता बीड मध्ये घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. महत्वाचे म्हणजे या अळीचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना पहायला मिळत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यतल्या आष्टी तालुक्यातल्या शिराळा गावात घोणस आळी चावल्यामुळे शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे. घोणस नावाची एक अळी जी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. घोणस नावाची विषारी अळी अंगावर पडून तिने चावा घेतल्यानं असह्य वेदना झाल्यानं तीन शेतकऱ्यांना रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली आहे. यामुळं शेतकरी वर्गाच्या मनात धडकी भरली आहे. हा प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील शिराळा गावात उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिली आहे.

काय कराल उपाय ?

–ही अळी म्हणजे कोणत्याही पिकावरील किड नाही तर एक रानटी गवतावरील अळी आहे.
–जास्त प्रमाणात जर या अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर क्लोरोसायफर फवारणं गरजेचं असल्याची माहिती देखील गोरख तरटे यांनी दिली.
–परंतू जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नसेल तर काही फवारण्याची गरज नाही.
— शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून अळीपासून संरक्षण करण्यासाठी फुल कपडे घालणे गरजेचे आहे.
— ही अळी शरीरावर येऊ नये याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केलं आहे.

अळी चावल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात ?

–घोणस अळीने चावा घेतल्यास असाह्य वेदना होतात
— उलट्या होतात.

दरम्यान, जिथे ही अळी आढळली तिथे जाऊन कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाहणी करणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे.

Leave a Comment