Ahmednagar News : काय सांगता? चोरट्यांनी चक्क सरपंचाच्या शेतातील डाळिंब नेले चोरून; लाखो रुपयांचे झाले नुकसान

Ahmednagar News । टोमॅटो सोबतच सध्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाला देखील चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या डाळिंबाला चांगला भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांना याची देखभाल करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. कारण की डाळिंबाला भाव मिळत असल्यामुळे चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचे राखण देखील करावी लागत आहे. मागच्या काही दिवसापासून टोमॅटो चोरीला गेलेल्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या देखील आता डाळिंब चोरीला गेल्याची एक धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातून समोर आली आहे यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील केसापूर दवणगाव या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केसापूर येथील सरपंच बाबासाहेब पवार यांच्या गट नंबर 34 मधील शेतीतील काढणीला आलेले डाळिंब चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास जर चोरट्यांनी चोरून नेला तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. (Ahmednagar News)

शेतकऱ्याचे सहा लाखाचे नुकसान

चोरट्यांनी चोरून नेलेल्या डाळिंबामुळे सरपंच बाबासाहेब पवार यांचे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या घटनेमध्ये दवणगाव येथील उपसरपंच भरत होऊन यांच्या देखील डाळिंबाची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सगळीकडे बिबट्याची भीती आहे त्यामुळे रात्रीची राखण करण्यासाठी शेतकरी जात नाही याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी डाळिंब चोरले आहेत.

त्यामुळे आता पोलिसांनी देखील याबाबत कठोर पावले उचलावी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये गस्त वाढवावी अशी मागणी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ पवार त्याचबरोबर दवणगाव गावचे सरपंच मेजर भाऊसाहेब फुके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

See also  लंपी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई मिळवी : अजित पवार

Leave a Comment