Category: पीक लागवड

  • मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय करावे नियोजन ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे. मान्सून वेळेत परतत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती कामं करावीत. पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

    कांद्याची लागवड :

    साधारणात: बियाणे टाकल्यापासून 45 दिवसांमध्ये कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार होता. त्यामुळं आता कांद्याचे बी टाकले तरी चालेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

    द्राक्ष आणि डाळिंब छाटणी

    द्राक्ष बागेची छाटणी शेतकऱ्यांनी केली तरी चालेल. छाटणी करण्यास अडचण काही नाही. कारण, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस निरोप घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरुवात केली तरी चालेत. त्याचबरोबर डाळींबाची पानगळणी केली तरी चालेल. कारण आता जर पानाची छाटणी सुरु केली तर मार्च ते एप्रिलपर्यंत पिक बाजारात येईल. ‘हस्त बहार’ नियोजन करण्यास सध्याचा काळ योग्य जाणवत आहे.

    खरीपातील पिकांची काढणी

    खरीपातील आगाप मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये ही पिके परतणीच्या स्टेजमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्या काढणीच्या तसेच पशुधनासाठीच्या मुरघास प्रक्रिया आणि साठवणीच्या नियोजनासाठीचा वातावरणाच्या नजरेतून सध्याचा काळ योग्य जाणवत आहे. त्याचे योग्य ते नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करावी सोयाबीन आणि बाजरीचे पिक काढणी करण्याच्या स्टेजमध्ये आहे. त्यासाठी पूर्वनियोजन करावे लागते. विशेषत: मजूर लावून करायची असेल तर त्याचे नियोजन मशीननं काढणी करायची असेल तर त्याचे शेतकऱ्यांनी आत्ताच नियोजन करावं

    मुरघास तयार करण्यासाठी मकेची काढणी करावी

    आगाप मका आता काडणी करायला सुरुवात केली तरी चालेल. ज्या शेतकऱ्यांना मुरघास तयार करायचा आहे, असा शेतकऱ्यांनी मकेची तोडणी करावी असे खुळे यांनी सांगितले आहे. तर बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ही पिकं 15 ऑक्टोबरच्यानंतर काढणीसाठी येणार आहेत, त्यादृष्टीनं शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन करावे.

    संदर्भ : एबीपी माझा

  • बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग आणि किडींचा हल्ला; कसे कराल व्यवस्थापन ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    1)सोयाबीन : उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारावे.

    २)खरीप ज्वारी : पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा मॅलाथिऑन 5% भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे धुरळणी करावी किंवा मॅलाथिऑन 50% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ३)ऊस : पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ४)हळद : हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

    ५) हरभरा : हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास कोरडे व थंड हवामान मानवते.

    ६) करडई : करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा आणि ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन काढणीनंतर करडई पीक घ्यावे.

  • सद्य हवामानात तयार पिकाची कशी काळजी घ्याल ? नवीन कोणती पिके घ्याल ? कृषी शास्त्रज्ञांनी दिला सल्ला

    हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सर्व शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची फवारणी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण पावसात औषध वाहून जाणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. या हंगामात उभ्या भात पिकामध्ये पाने पिवळी पडत असल्यास, त्याच्या प्रतिबंधासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन @ 15 ग्रॅम आणि कॅम्फर हायड्रॉक्साईड @ 400 ग्रॅम प्रति हेक्टरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी 10-12 दिवसांच्या अंतराने करावी.

    भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, या हंगामात बासमती भातामध्ये फॉल्स स्मट दिसण्याची खूप शक्यता आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे भाताचे दाणे आकाराने फुगतात व पिवळे पडतात. प्रतिबंधासाठी, ब्लाइटॉक्स ५० @ २.० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा फवारणी करावी.

    स्वीट कॉर्न ची पेरणी

    शेतकरी या हंगामात स्वीट कॉर्न (माधुरी, विन ऑरेंज) आणि बेबी कॉर्न (एचएम-4) पेरू शकतात. तयार केलेल्या शेतात मोहरीची पेरणी लवकर करता येते. सुधारित वाण- पुसा मोहरी-२८, पुसा तारक इ. बियाणे दर ५-२.० किलो. प्रति एकर. या हंगामात वाटाणा लवकर पेरता येतो. सुधारित वाण – पुसा प्रगती, बियाणे बुरशीनाशक कॅप्टन @ 2.0 ग्रॅम फवारणी करावी. प्रति किलो. बीज दरानुसार प्रक्रिया करा आणि त्यानंतर रायझोबियम टोचणी द्या. गूळ पाण्यात उकळून थंड करून बियांमध्ये रायझोबियम मिसळा, सुकण्यासाठी सावलीच्या जागी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पेरणी करा.

    सुधारित बियाणे पेरणी करावी

    भाजीपाला (टोमॅटो, वांगी, फ्लॉवर आणि कोबी) आणि फुलकोबी/फुलकोबीमधील डायमंड सॅक मॉथमध्ये डोके आणि फळ बोअररचे निरीक्षण करण्यासाठी @ 3-4/एकर फेरोमोन सापळा. ज्या शेतकऱ्यांची टोमॅटो, हिरवी मिरची, वांगी आणि फुलकोबीची रोपे तयार आहेत, त्यांनी हवामान लक्षात घेऊन उथळ वाफ्यावर (उथळ वाफ्यावर किंवा बांधावर) लागवड करावी. या हंगामात मुळा (पुसा चेटकी), पालक (पुसा भारती, अल्ग्रीन), राजगिरा (पुसा लाल चौलाई, पुसा किरण) इत्यादी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार असल्यास उंच बांधावर पेरणी करता येते. प्रमाणित किंवा सुधारित बियाण्यापासून पेरणी करावी.

     

     

     

  • भात पिकाच्या सद्यस्थितीत कसे कराल कीड आणि रोगांचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या भात पीक हे पुनर्लागवडीनंतर ३० ते ६० दिवसांच्या कालावधीमध्ये आहे. या काळामध्ये बहुतांश पीक हे फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. या काळामध्ये खोड कीड, तपकिरी तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, सूत्रकृमी, करपा, कडा करपा, पर्णकोष करपा, खोड कुज अशा कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आपल्या पिकामध्ये कीड किंवा रोगाची व्यवस्थित ओळख पटवून पुढील पैकी योग्य ती उपाययोजना करावी.

    खोड कीड 

    जर एका सापळ्यात ३० ते ३५ पतंग एका आठवड्यात दिसून आल्यास पुढील प्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी. पोटरी अवस्थेत पीक असताना कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर (किंवा १००० ग्रॅम प्रति हेक्टर) किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि प्रति लिटर (किंवा १५० मिलि प्रति हेक्टर) या प्रमाणे फवारणी करावी.

    तपकिरी तुडतुडे 

    किडीच्या नियंत्रणासाठी अधूनमधून शेतातील पाण्याचा निचरा करवा. १-२ दिवसासाठी शेत कोरडे ठेवावे. परभक्षी कीटकाच्या संवर्धनासाठी बांधावर चवळी, मूग, सोयाबीन, झेंडू किंवा इतर फुलझाडे लावावीत. जर तुडतुड्यांची संख्या प्रति झाड १०-१५ पेक्षा जास्त असल्यास पुढील पैकी एक फवारणी करावी.

    (फवारणी प्रमाण- प्रति लिटर पाणी)

    क्विनॉलफॉस (२५ % इसी) १.५ मिलि किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा डायनोटेफ्युरॉन (२० एसजी) ०.३ ते ०.४ ग्रॅम किंवा पायमेट्रोझीन (५०% डब्ल्यूजी) ०.६ ग्रॅम किंवा ट्रायफ्लूमेझोपायरीन (१० % एससी) ०.४७ मिलि

    टीप ः पीक ४५ ते ६० दिवसांचे असेपर्यंत या कीटकनाशकाची फक्त एकदाच फवारणी करावी.

    पाने गुंडाळणारी अळी

    फवारणी प्रति लिटर पाणी

    कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि.

    सूत्रकृमी

    पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी कार्बोफ्युरॉन (३ जी) ३३ किलो प्रति हेक्टरी वापरावे.

    करपा

    ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) ०.६ ग्रॅम किंवा आयसोप्रोथीओलेन १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

    1)अणुजीवजन्य करपा/ कडा करपा

    शेतात या रोगांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर नत्रयुक्त खते अत्यंत कमी द्यावीत किंवा देऊ नयेत.

    2)पर्णकोष करपा

    हेक्साकोनॅझोल (५ ईसी) २ मिलि प्रति लिटर प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारावे.

    3)खोड कुज

    शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. त्यानंतर प्रोपीकोनॅझोल १ मिलि किंवा डायफेनोकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

  • धुळ्यात पावसाचा कपाशीला फटका; रोग किडींचा प्रादुर्भाव, कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने उघडीप दिली आहे मात्र काही भागात अद्यापही पाऊस पडतो आहे. धुळे जिल्यात देखील पाऊस झाल्यामुळे त्याचा मोठा फटका कपाशीच्या पिकांना बसला आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे. यामुळं शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

    धुळे तालुक्यात तसेच साक्री तालुक्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळं शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पावसामुळं कपाशीच्या बोंडांचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार धुळे तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्राला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी धुळे तालुक्यात 1 लाख 7 हजार 109 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती त्यात 77 हजार 295 हेक्टरवर कापूस होता. यंदा 1 लाख 747 हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी तब्बल 84 हजार 961 हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र अकरा हजार हेक्टरनं वाढलं आहे.

    मागील दोन वर्षात कापसाला चांगला दर मिळत असल्यामुळे यंदा देखील कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. मागील वर्षी देखील पावसामुळे कापसाच्या उत्पन्नांत घट झाली होती. आता या वर्षी देखील तीच स्थिती होईल या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. आधीच जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यातूनही पीक कसेबसे वाचवल्यानंतर आता पुन्हा रोग आणि किडींचे संकट उभे आहे.

    सद्य स्थितीत कापूस पिकातील व्यवस्थापन

    –कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
    –कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
    –कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे.

     

  • कसे कराल लिंबूवर्गीय फळांवरील तपकिरी कुज, देठ सडचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : अधून मधून पाऊस , थंड हवा आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे लिंबूवर्गीय फळांवर विशेषतः आंबिया बहराच्या संत्रा, मोसंबी फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आजच्या लेखात आपण याचबाबत माहिती घेऊया…

    फायटोफ्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे

    १) पानावरील चट्टे लक्षणे :
    –पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना फायटोप्थोरा या बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होतो.
    –यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी व मलूल होतात. अशी पाने हातात घेऊन चुरा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची घडी होते, मात्र पाने फाटत नाहीत. —टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर होऊन पाने तपकिरी काळी होतात.
    –नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्या पर्णविरहित होतात झाड जणू खराटे सारखे दिसते.
    –परिणामी, अकाली फळगळ होते. पानावरील चट्टे संक्रमण रोपवाटिकेमधील कलमा तसेच नुकेतच लागवड केलेल्या कलमांवर सुद्धा दिसून पडतात.

    २) फळावरील तपकिरी रॉट किंवा फळावरील कुज लक्षणे :
    –पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरवी असलेली फळे यावर तपकिरी, करड्या डागांची सुरुवात होते.
    –फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते.
    –फळाच्या हिरव्या सालीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगामध्ये परावर्तित होते.
    –फळे सडून गळतात.
    –या फळसडीच्या अवस्थेस तपकिरी कुज (ब्राऊन रॉट) असे म्हणतात.
    –फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते.
    –तोडीवेळी करड्या रंगाची फळे निरोगी फळात मिसळली गेल्यास निरोगी फळेही सडतात.

    फळमाशी

    –सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यामध्ये फळमाशीमुळे फळगळ होताना दिसते.
    –या किडीची मादी माशी आणि तिच्या अळीमुळे फळांचे नुकसान होते. प्रौढ मादी फळाच्या सालीखाली एक किंवा अनेक अंडी घालते.
    –तीन ते पाच दिवसांत अंडी उबल्यानंतर त्यातून मळकट पांढऱ्या रंगाच्या लहान पाय नसलेल्या अळ्या बाहेर पडतात.
    — या अळ्या फळामध्ये शिरून, रस व गरावर गुजराण करतात. त्यामुळे फळांचा नाश होतो, त्याची गुणवत्ता घटते.
    –अंडी घालतेवेळी पडलेल्या छिद्राच्या भागामध्ये अन्य रोगजंतू किंवा बुरशींचा प्रादुर्भाव होऊन पिवळे डाग पडतात.
    –अकाली फळगळ होते. असे फळ दाबले असता फळातून छिद्रे असलेल्या जागेतून रसाचे पिचकारीसारखे फवारे उडतात.

    व्यवस्थापन :

    १) सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच पडून राहिल्यास रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होते. प्रसार जलद गतीने होते. बागेतील वाफे स्वच्छ ठेवावेत.
    २) बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. जिथे पावसाचे पाणी साठून राहते, त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
    ३) प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटील ए.एल.* २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी झाडाच्या परिघात, खाली पडलेल्या पाने व फळांवरही करावी. त्यामुळे त्यावरील बुरशीचा नायनाट होईल. तसेच जमिनीवरील सक्रिय बीजाणूही नष्ट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी यात अन्य कोणतेही बुरशीनाशक/कीटकनाशक/विद्राव्य खते मिसळू नये.
    ४) रासायनिक घटकांच्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या नंतर ट्रायकोडर्मा हार्जियानम* १०० ग्रॅम अधिक सुडोमनास फ्ल्यूरोसन्स* १०० ग्रॅम या प्रमाणे १ किलो शेणखतात मिसळून झाडाचे परिघात जमिनीतून द्यावे.

    कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे :

    –कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होते.
    –तो भाग काळा पडतो. हा काळा भाग नंतर वाढत जातो. संपूर्ण फळ सडते.
    –कोवळ्या फांद्यांवरील पाने सुकणे, वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत.
    –बरेचदा उशिरा झालेल्या प्रादुर्भावामुळे रोगग्रस्त फळे आकुंचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.

    व्यवस्थापन:

    कोलेटोट्रीकम बुरशीमुळे होणाऱ्या फळगळीसाठी बोर्डो मिश्रण ०.६ टक्का मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी)* २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

     

  • पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज कशी घ्याल कापूस,तूर,भुईमूग, मका आदी पिकांची काळजी ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भ मराठवाड्यासह काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    १) कापूस : पुढील तिन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे.

    २)तूर : पाऊस झाल्यानंतर तूर पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ३) भुईमूग : भुईमूग पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत रब्बी भुईमूग पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

    ४)मका : मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी.

    ५)रब्बी ज्वारी : रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते.

    ६) रब्बी सूर्यफूल : रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.

  • HI-8663 या जातीचे गव्हाचे वाण हेक्टरी 90 क्विंटल उत्पादन मिळेल, जाणून घ्या काय आहे त्याची खासियत

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशात खरीप हंगाम जवळपास संपत आला आहे. बाजरी, ज्वारी आणि इतर पिकांची शेतं हळूहळू रिकामी होऊ लागली आहेत.रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी शेत तयार करत असून देशात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज आपण गव्हाच्या अशा विविध प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे उत्पादन 95.32 क्विंटल प्रति हेक्टर आहे.

    गव्हाचे हे खास वाण

    यावेळी गव्हाच्या वाणांमध्ये HI-8663 हे नाव सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांमध्ये आघाडीवर आहे. त्याच्या उत्पादकतेबद्दल बोलायचे झाल्यास, प्रति हेक्टर 95.32 क्विंटल सांगितले जात आहे. HI-8663 हे जीनोटाइप वैशिष्ट्यपूर्ण, उच्च दर्जाचे आणि उच्च उत्पन्न देणारे गव्हाचे बियाणे आहे.

    HI-8663 मध्ये ही आहे खास गोष्ट

    HI-8663 मध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, त्यामुळे बाजारात याला खूप मागणी आहे. या गव्हापासून ब्रेड व्यतिरिक्त रवा आणि पास्ता देखील बनवला जातो आणि त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण आढळते.

    गव्हाच्या पेरणीसाठी योग्य वेळ

    साधारणपणे नोव्हेंबर महिना हा गव्हाच्या पेरणीसाठी योग्य मानला जातो, परंतु या जातीची पेरणी डिसेंबर महिन्यातही करता येते. याशिवाय, ते इतर जातींपेक्षा लवकर परिपक्व होते आणि उष्णता सहज सहन करू शकते. मध्य प्रदेशात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

     

  • प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झालाय ? कसे जगवाल वावरातल्या कापूस पिकाला ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. याचा परिणाम शेतात असलेल्या कापूस पिकावर झाला आहे. अशावेळी पिकावर परिणाम होतो. पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. आजच्या लेखात आपण प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यावर कापूस पिकाची काळजी कशी घ्यावी ? जाणून घेऊया…

    कापूस पिकाला अतिपाऊस झाल्याने काय होतो परिणाम ?

    –पीक पाण्यात दीर्घकाळ बुडून राहिल्यास कपाशीच्या मुळ्या सडतात.
    — कपाशी मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा नसल्यामुळे मुळे आवश्यक ती अन्नद्रव्ये उचलू शकत नाहीत.
    — झाडे सुकू लागतात किंवा मलूल होतात, त्यालाच आकस्मिक मर रोग असे म्हणतात.
    — वास्तविक यासाठी कोणतीही बुरशी, जिवाणू किंवा विषाणू जबाबदार नाहीत. म्हणजेच हा रोग नाही.
    –कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडांवरील पाने क्षीण व मलूल होतात. खालच्या बाजूने वाकतात. झाडांमधील ताठरपणा कमी होतो. झाड मेल्यासारखे दिसते.

    उपाययोजना 

    -शेतातील साचलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढावे. सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी. अशी मरग्रस्त कपाशीझाडे आढळल्यास थोडाफार वाफसा येताच झुकलेली झाडांना झुकलेल्या बाजूकडून मातीची भर द्यावी. ती सरळ करून, दोन पायांमध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत. अशा झाडांच्या बुंध्यापाशी कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक युरिया १५ ग्रॅम अधिक पोटॅश १० ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सि क्लोराईड प्रति २०० लिटर पाणी या द्रावणाची आळवणी करावी. पाठीवरील पंपाचे नोझल काढून, प्रत्येत झाडाजवळ साधारण १०० मिलि द्रावण बांगडी पद्धतीने पडेल, असे पाहावे. त्यानंतर झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे. आकस्मिक मर रोखण्यासाठी कपाशीच्या शेतात भेगा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी वेळोवेळी कोळपण्या कराव्यात.

    पाऊस उघडिपीनंतर कपाशीचे व्यवस्थापन

    पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुढील उपाययोजना कराव्यात. पिकातील आंतरमशागतीची कामे स्वच्छ व कोरड्या वातावरणात करावीत. बीटी/संकरित कपाशीस सुरवातीच्या काळात येणाऱ्या फुलांचे रूपांतर पात्यात व बोंडात होण्याचे प्रमाण जास्त असते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी व नंतर होणाऱ्या लाल्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जमिनीद्वारे मुख्य अन्नद्रव्यासोबत दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणीही आवश्यक असते. लाल्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कपाशीवर मॅग्नेशिअम सल्फेट १ टक्के म्हणजेच १० ग्रॅम अधिक + युरिया १ टक्के म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी करावी. या द्रावणामध्ये कोणत्याही कीडनाशकाचा वापर करू नये. कपाशीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना २ टक्के युरिया किंवा २ टक्के डीएपी (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) किंवा १९:१९:१९ (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या अन्नद्रव्यांची ४५ व ६५ व्या दिवशी फवारणी करावी. फुलोरा अवस्थेत ००:५२:३४ (४ ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी. फुलोरा अवस्था, पाते व बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्के) (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) ही फवारणी करावी.

    नैसर्गिक कारणामुळेही कपाशीची पात्या, फुले, बोंडे यांची गळ होते. ती कमी करण्यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एनएए) या वाझ नियंत्रकाची ३ ते ४ मिलि प्रति १० लिटर पाणी अशी पहिली फवारणी करावी. यानंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी. कपाशीची कायिक वाढ जास्त होऊन बोंडे कमी लागली असल्यास, क्लोरमेक्वाट क्लोराईड (५० % एस.एल.) या वाढ नियंत्रकाची १० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. कपाशीच्या परिपक्व बोंडाची बाह्य बोंड सड होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा प्रोपीनेब (७० डब्लू.पी.) २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तसेच अंतर्गत बोंड सड रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्लू.पी.) २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पाऊस उघडिपीनंतर किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यावर लक्ष ठेवावे.

  • ओळख आणि व्यवस्थापन काटेरी अळी (घोणस अळी) चे…..!

    हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसापासून वृत्तपत्र, दुरदर्शन व विविध सामाजिक माध्यमंमार्फत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात उसावर आढळून आलेल्या एका अळीमुळे जिची ओळख शास्त्रीय भाषेमध्ये स्लग कॅटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. जिच्या काट्यांचा दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले त्यामुळे या अळी बद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती बसली असून त्याबद्दल बरचसे गैरसमज निर्माण झाले आहेत.

    अळीची ओळख

    हिला स्लग कॅटरपिलर किंवा काटेरी अळी किंवा डंक मारणारी स्लग अळी असेही म्हणतात. हि एक पंतगवर्गिय कीड असून ती लिमाकोडिडे (स्लग कॅटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे.
    ह्या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ तरंगत चालण्याच्या लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात.
    ह्या अळीचे पतंग त्यांच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात, पंतग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडू शकत नाहीत, म्हणून ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. म्हणून, या जातीच्या अळ्यांनी स्वतःचा भक्षाकापांसून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. अशा काट्यामध्ये थोडया प्रमाणात विष ही असते. ही एक स्व:संरक्षणाची रणनीती आहे. तसेच ह्या अळ्या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाद्वारे आणि काटे किंवा केसांद्वारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात. हे या अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या किडीच्या काट्यांच्या दशांमुळे काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नसतात.

    आढळ-

    ही कीड भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये आढळून येते.

    खाद्य वनस्पती-

    बहूभक्षी प्रकारातील कीड आहे- विशेषतः एरंडी, आंबा, केळी, डाळींब, लिंबूवर्गीय फळे, इतर फळझाडे, देशी बदाम, ओक, चहा, कॉफी, शोभेच्या वनस्पती, तणे आणि इतरही वनस्पती वर आढळून येते.

    पिकांसाठी किती धोकादायक-

    ही अळी फारसे नुकसान करत नाही. परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात त्यामुळे झाडाला फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहतात आणि मोठे नुकसान होते.

    अळीच्या काट्यांचा दंश झाल्यास काय होऊ शकते-

    या गटातील अळ्या त्यांच्या शरीरावर असलेल्या काट्यांमुळे आणि केसांमुळे सहज लक्षात येतात.त्याचा उद्देश त्यांच्या भक्षकांना परावृत्त करणे हा आहे. अळी लोकांच्या “मागे” जात नाहीत. परंतु तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास किंवा चूकून संपर्कात येऊन शरीर घासले गेल्यास त्याठिकाणी काट्यांचा दंश होऊन अपाय होऊ शकतो आणि लक्षणे उद्भवतात. अशा काट्यांमध्ये असलेले विष शरीरात प्रवेश करते. स्पर्श झालेल्या ठिकाणी अळीचे केस अथवा काटे शरीरात तसेच राहतात. दंश हा मधमाशीच्या डंखासारखा त्रासदायक असतो. विष हे सौम्य स्वरूपाचे असते परंतु वेदना होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सूज येणे आणि फोड येणे या सारखी लक्षणे दिसू शकतात. सहसा लक्षणे ही तात्पुरत्या स्वरूपाची असतात आणि एका दिवसात निघून जातात किंवा कमी होतात, परंतु जर ती तीव्र स्वरूपाची किंवा जास्त वेळाकरीता कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. काही अतिसंवेदनशील लोकांना अशा अळीच्या संपर्कात आल्यास त्यांना असलेल्या ॲलर्जीमुळे जास्त त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना अस्थमा, ॲलर्जी या सारख्या समस्या असतील अशा लोकांनी सावधगिरी बाळगून अपाय होऊन जास्त त्रास झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यावेत.

    ताबडतोब करावयाचे उपाय अथवा उपचार

    काही तज्ञ सूचित करतात की चिकट टेप प्रभावित भागात हलक्या हाताने लावून काढावा त्याने शरीरात गेलेले अळीचे केस किंवा काटे सहज निघण्यास मदत होईल. लक्षणे सौम्य स्वरूपाची असतील तर अपाय झालेल्या ठिकाणी बर्फ लावल्यास किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावल्यास त्रास कमी होतो.

    अळीचे नियंत्रण-

    कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामध्ये क्विनालफास, इमामेक्टिन बेंझोएट, फ्लूबेंडामाईड सारखे कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात. तसेच बरेच नैसर्गिक मित्र कीटकांद्वारे ही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते.

    तरी सर्वांनी कोणत्याही “केसाळ” किंवा “काटेरी” अळ्यापासून स्वरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळी मुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार करावेत.

    डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

     

    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
    परभणी
    ☎ ०२४५२-२२९०००