Category: बातम्या

  • कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ? नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र

    हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याचा दर घसरल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांना पात्र लिहिले आहे. याद्वारे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रिक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.

    काय आहे पत्रात ?

    या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, कांदा हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून देशातील एकूण उत्पादनाच्या 35 ते 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतं. चांगल्या पावसामुळे कांद्याचं उत्पादन 2021-22 मध्ये 136.70 लाख मेट्रिक टन झाले, जे आधीच्या वर्षापेक्षा 20 लाख मेट्रिक टनाने जास्त होतं. एकंदरच बाजारपेठेतील किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरलं आहे. एरवी श्रीलंकेकडून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात होतो. मात्र, तिथल्या आर्थिक संकटामुळे या आयातीमध्ये देखील अडचणी आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सततच्या बदलत्या परिस्थितीमुळे आपल्याकडील शेतकऱ्यांना निर्यातीतून उत्तम किंमत मिळणं शक्य होत नाही.

    केंद्र सरकारने देखील निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि कर माफीच्या योजनेत दोन टक्क्यांऐवजी दहा टक्क्यांपर्यंत लाभ वाढवून द्यावा, अशी राज्य सरकारची विनंती देखील नाकारली आहे. आपल्या मंत्रालयाने या योजनेत 10 टक्क्यांपर्यंत लाभ दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायद्याच होईल. त्याचप्रमाणे सध्या नाफेडकडून कांदा खरेदी सुरु आहे ती आणखी 2 लाख मेट्रिक टनाने वाढवावी, अशी देखील विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाफेडने यापूर्वीच 2.38 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी यावर्षी एप्रिल ते जून महिन्यात केली आहे. आणखी 2 लाख मेट्रिक टन खरेदी केल्यास कांदा उत्पादकांना किंमतीच्या बाबतीत दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.

    संदर्भ : एबीपी माझा

  • खरिपातील कापसावर थ्रिप्स तर सोयाबीन वर लष्करी अळीचा हल्ला ;बळीराजा हवालदिल !

    हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी प्रतिनिधी

    खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाल्याने कापुस लाल झाला पडला असून दुसरीकडे सोयाबीन पिकावर लष्करी अळीने हल्लाबोल केला आहे .अतिवृष्टी व पावसाच्या खंडानंतर आधीच उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येणार असताना आता किटकांनी हल्ला केल्याने परभणी जिल्हातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

    जिल्हातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेली संकटाची मालिका थांबायचे नाव घेत नाहीये .आधी मान्सूनचे उशिरा आगमन झाले त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या . त्यात अतिवृष्टी पावसाचा खंड यामुळे जिल्ह्यातील शेतीशिरात पेरणी केलेले क्षेत्र यातून मिळणारे अपेक्षित उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.

    आपण जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्राची प्रतिनिधी माहिती घेतल्यानंतर जिल्ह्याचे चित्र याविषयी कल्पना येईल .मागील आठवड्यात खरिपातील पावसाच्या खंडानंतर शेतकऱ्यांना विमा अग्रीम देण्यासाठी ५२ महसूल मंडळापैकी आठ महसूल मंडळांची निवड करण्यात आली आहे .त्यामध्ये निकषांमध्ये बसत असतानाही पाथरी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळ वगळण्यात आले आहेत नेमकी काय परिस्थिती पाथरी तालुक्यातील महसूल मंडळामध्ये आहे याविषयी आपण घेतलेला हा मागवा व सद्य परिस्थिती.

    यंदा पाथरी तालूक्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या प्रस्तावित क्षेत्रापैकी ऊस वगळता ७१ .७२% क्षेत्रावर म्हणजे ३७ हजार ३८० हेक्टर हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण केली .यामध्ये सर्वाधिक १६ हजार ६५४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी तर मागील वर्षी मिळालेल्या चांगल्या दरामुळे १६ हजार ४३२ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती.

    जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. सततच्या पावसाने खरिपात पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटल्या गेली .ही पिके कशीबशी सावरत असताना ऐन फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये ऑगष्ट महिण्यात पावसाने मोठा खंड दिला .१० ऑगस्ट पासून ते ५ सप्टेंबर पर्यंत तालुक्यात येणाऱ्या चारही महसूल मंडळांमध्ये यावेळी पावसाने ओढ दिली होती .या खंडामुळे फुल अवस्थेत असणाऱ्या सोयाबीनला मोठा फटका बसला तर कापसामध्ये ही पातेगळ होऊन स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केलेली मेहनत वाया गेली .आस्मानी संकटापुढे स्थानिक शेतकरी हातबल होता दरम्यान अग्रीम विमा मिळेल अशा आशेवर असणारा शेतकरी चारही महसूल मंडळ अग्रीम विमा देण्यातून वगळण्यात आल्याने सुलतानी संकटाने होरपळून निघाला.

    दरम्यान ५ सप्टेंबर पासून तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये पावसाचे जोरदार पुनरागमन झाले होते .दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून शेत शिवारात मात्र सर्वच पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या फवारण्या करूनही कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाला असून यामुळे कापूस लाल पडला आहे तर कापसाची पातेगळ मोठ्या प्रमाणात झाल्याने कापसामध्ये ४०% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत .महागड्या फवारण्या करूनही हा रोग काही आटोक्यात येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत .तर दुसरीकडे सर्वाधिक पेरणी क्षेत्र असलेल्या फुलगळ होऊन उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक हा बुरशीजन्य रोग व मोठ्या प्रमाणात पाणी खाणाऱ्या लष्करी अळीचा हल्ला झाल्या असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे . सततच्या या संकटांच्या मालिकेने स्थानिक शेतकरी मात्र हातबल झाला असुन व्यथा सांगावी तरी कोणाला ? असा त्याच्यापुढे प्रश्न पडला आहे .

  • मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं तरी ते फक्त दही हंडीच फोडतायेत, राजू शेट्टींचा एकनाथ शिंदेंना टोला

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाचा दर्जा रसातळाला गेला आहे. सर्वसामान्य माणसाला देखील याची किळस येऊ लागली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचि टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

    पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या दोन महिन्यात राज्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे. जनावरांवर लम्पीसारखा आजार आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन यंत्रणा कामाला लावण्याची जवाबदारी पालकमंत्र्यांची असते. मात्र, जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळाले नाहीत. यामुळं या सरकारचे अस्तित्व शून्य झाले असल्याचे शेट्टी म्हणाले.

    एवढा मोठा पाऊस पडला, जमिनी वाहून गेल्या, शेती पिकं वाया गेली. तरी महसूल खात्यान घरात बसून पंचनामे केले. कृषी अधिकारी शिवारात फिरकले नाहीत याचा हा परिणाम आहे. त्यांना जाब विचारणार कोण. अजूनही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्रीच नाहीतर आढावा कोण घेणार? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

    मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. गणपतीच्या काळात घरा घरात जाऊन दर्शन घेत राहिले. मुख्यमंत्र्यांनी धार्मिक असावं, उत्सव साजरा करावा, पण उत्सव साजरा करण्यापूर्वी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची आपल्यावर जबाबदारी आहे याचं भान ठेवलं पाहिजे असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

  • गोगलगायीग्रस्तांना शासनाकडून 98 कोटींची मदत; पहा कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार भरपाई ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप हंगामाची सुरुवात कोरड्याने झाली. जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वावरात पिके अंकुरित असतानाच पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अख्खी पिके नष्ट झाली. हा प्रादुर्भाव बीड, उस्मानाबाद आणि लातूर या भागात जास्त झाला होता. मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात खरीप हंगामात गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांना विशेष अनुदान देण्याबाबत सरकराने आदेश काढला आहे. गोगलगायीग्रस्तांना ९८ कोटी ५८ लाख रुपयांची मदत सरकार कडून मिळणार आहे. पावसाळी अधिवेशनापासून गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत होती. अखेर सरकारने तीन जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी मदत देण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक ९२ कोटी ९९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

    निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत

    यंदाच्या हंगामात राज्यात अंदाजे ४८.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने लागवडीखालील क्षेत्र दोन लाख हेक्टरहून अधिक वाढले आहे. मात्र यंदा अतिवृष्टी आणि गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनला तडाखा बसला आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. सरकारी यंत्रणेने पंचनामे केल्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषात बसत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या वाढीनुसार १३ हजार ३०० रुपयेप्रमाणे प्रति दोन आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येणार आहे.

    कुणाला किती  ?

    –लातूर जिल्ह्याला दोन हेक्टरपर्यंत बाधित ९२ हजार ६५२ शेतकऱ्यांच्या ५९ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रासाठी ८१ कोटी २७ लाख, ८४ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
    –बीडमधील १२ हजार ९५९ शेतकरी या निकषात बसत असून, ३८२२. ३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यापोटी ५ कोटी १९ लाख ८४ हजार,
    –उस्मानाबादमधील ४०१ शेतकऱ्यांना २८३. ८३ हेक्टर क्षेत्रासाठी ३८ लाख सहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
    लातूरमधील तीन हेक्टरच्या मर्यादेच्या निकषातील १२ हजार ९८४ शेतकऱ्यांच्या ८६२०.७० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ कोटी ७२ लाख, ४२ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

    अशी मिळणार मदत

    बाधित शेतकरी – क्षेत्र – मदत (लाखांत)
    बीड : १२९५९ – ३८२२- ५१९. ८४
    लातूर : ९२६५२- ५९७६४-८१२७.९४
    उस्मानाबाद : ४०१-२८.३-३८.६

    (दोन ते तीन हेक्टर)
    लातूर : १२९८४-८६२०.७०- ११७२.४२

    फेरसर्वेक्षण करण्याची मागणी

    बीड जिल्ह्यात १४ हजार हेक्टरपेक्षा क्षेत्र बाधित आहे, तरीही केवळ ३८२२ हेक्टर क्षेत्र बाधित दाखवले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात केवळ दोन कोटी ५९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरकार अर्धवट माहिती समोर आणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. त्यामुळे या क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

     

  • मुख्यमंत्री साहेब आम्ही महाराष्ट्रात राहतो का.. बिहारमध्ये…? शेतकऱ्याने रक्ताने लिहिले पत्र, मागितली भरपाई

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत 15 सप्टेंबरपासून मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, दुसरीकडे असे अनेक जिल्हे आणि असे अनेक तालुके आहेत, ज्यांना पंचनामा करण्यापासून दूर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. अशा परिस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ज्यात शेतकऱ्याला नुकसान भरपाईच्या प्रक्रियेपासून दूर ठेवल्याचा सवाल केला आहे.

    शेतकऱ्याने रक्ताने लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे की ते महाराष्ट्रात राहतात की बिहारमध्ये? शेतकरी पुढे म्हणाले की, आम्ही सुद्धा महाराष्ट्रात राहत असून आमच्या तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, आम्हालाही मदतीची गरज आहे.शेतकऱ्याने मागणी केली आहे.

    शेतकरी दु:खी आहेत

    यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नाल्यांचे व नद्यांचे पाणी शेतात शिरल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवीन सरकार पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र, सेनगाव तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

    सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांचे पंचनामे भरण्यात आले. अतिवृष्टीग्रस्तांना 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपयांची मदत वाटप करण्यात येणार असल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले. मात्र, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, बाभूळगाव, पुसेगाव या चार मंडळांना अतिवृष्टीतून वगळण्यात आले असून, पंचनामा झाला नाही. अशा स्थितीत येथील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

    काय आहे पत्रात ?

    मा. मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब,

    विषय:-आम्ही महाराष्ट्रात राहतो का.. बिहारमध्ये…? अतिवृष्टीतून वगळ्याल्या प्रकरणी…

    सेनगाव तालुक्यात पेरण्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक शेतकरी देशोधडीला लागले. सगळे राजकारणात गुंतले होते. सोबत कृषी विभागालाही विसर पडला..

    सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपण अनेक मंडळे नाकारली. तालुक्यात सर्व दूर पाऊस असताना आपण तीन मंडळे अतिवृष्टीतून नाकारली. मग आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.?

    साहेब, अधिवेशनात घोषणा केली.. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.. मग हे काय खाजगी कंपनीने नाकी नऊ आणले? जगायचे कसे ते सांगा..

    अन्यथा अंगात राहिलेल्या बाकी रक्ताने अभिषेक करून आम्ही आमचे जीव सोडून देऊ.. अनुदान द्या..

     

  • जळगावात केळी पिकावर रोग; शेतकऱ्यावर रोपे उपटून टाकण्याची वेळ

    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर उत्पादनात घट झाली. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील केळी बागेवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही शेतकऱ्यांना केळीची रोपे उपटून फेकून द्यावी लागली आहे.यापूर्वी केळीचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

    वास्तविक, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळीचे सर्वाधिक पीक घेतले जाते. येथील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे मुख्य पीक केळी आहे. जळगावची केळी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रसिद्ध आहे. केळीची चव आणि चांगले उत्पन्न यामुळे येथील शेतकरीही संपन्न झाला आहे. मात्र यंदा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कधी निसर्गाच्या अवकृपेमुळे तर कधी रोगराईच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

    औषध फवारणीचा खर्च

    केळी पिकावरील कीड, रोग नियंत्रण, सीएमव्ही रोग यावर आतापर्यंत योग्य संशोधन झालेले नाही. केळी पिकात सीएमव्ही रोग प्रतिबंधक औषधेही लवकर उपलब्ध होत नाहीत आणि फवारणीसाठी औषधे उपलब्ध असली तरी ती खूप महाग असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसान होते. केळीचे संशोधन अद्याप सुरू असले तरी, कीटक, सीएमव्ही रोग, यापासून मुळापासून मुक्त होण्यासाठी रामबाण औषध तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. पण, हे तंत्रज्ञान किती काळात अस्तित्वात येईल, याची माहिती नसल्याने केंद्र व राज्य सरकार याबाबत कठोर भूमिका का घेत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

    शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

    काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील गोकुळ धनू पाटील या शेतकऱ्याने आपल्या तीन एकरातून केळीच्या चार हजार रोपांची लागवड केली होती. केळीची लागवड होताच काही दिवसात बागांवर काकडी मोझॅक विषाणू नावाचा रोग वाढल्याने पिके नष्ट होत होती. यानंतर शेतकरी नाराज झाला आणि त्याने रोप उपटून बांधावर फेकले. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

     

     

  • Lumpy : सरकारने तातडीने सर्व पशुधनाचा विमा उतरवावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी (Lumpy) हा त्वचा रोगाचा आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये हा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. या आधारावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. येत्या 10 दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करून द्यावा, खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचा केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने विमा उतरवण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

    राज्य सरकारकडून पशुधनाचा विमा उतरवावा

    राजस्थान हरियाणा नंतर आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लंपी (Lumpy) रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. अशातच लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. तातडीची उपाययोजना म्हणून येत्या दहा दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करुन द्यावा. खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचे केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने विमा उतरवावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

    पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांचा तुटवडा, अनेक ठिकाणी पदे रिक्त

    गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये वेळेत योग्य उपचार न झाल्यानं लम्पी (Lumpy) या आजारानं मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. सदर आजारातील देशी जनावरांच्या मृत होण्याची टक्केवारीचे प्रमाण जवळपास 10 टक्क्यांपर्यंत गेले आहे. मात्र, संबंधित राज्य सरकारकडून अपयश लपवण्यासाठी चुकीची आकडेवारी दर्शवली जात आहे. या आजारामुळेच देशामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण होवू लागला आहे. राज्य सरकारने लसीकरणास जरी सुरुवात केली असली तरी राज्यात पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांची पदे भरलेली नसल्याने डॅाक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे.

    लम्पी स्कीन (Lumpy) आजाराचा प्रामुख्याने देशी जनावरामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. महाराष्ट्रात खिलार, साहिवाल, गीर, देवणी, कोकण गीर, रेड सिंधी कांक्रेट या देशी जनावरांची संख्या जास्त आहे. बाजारांमध्ये जनावरांच्या किंमती गगनाला भिडल्या असून, या आजारात जनावरे दगावल्यास पशुपालकांना हा मोठा फटका बसणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. ज्याप्रमाणं कोरोना काळात कमी हप्त्यामध्ये जनतेला विमा उपलब्ध करुन दिला त्याचप्रमाणे राज्यातील सर्वंच जनावारांचा येत्या दहा दिवसात तातडीने विमा उतरवण्यात यावा. जेणेकरुन एखादे जनावर यामध्ये दगावल्यास संबंधित पशुपालकास होणाऱ्या नुकसानीचे अर्थसहाय्य मिळून त्या कुटुंबास आधार मिळेल, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

  • Facts About Lumpy Disease, In Maharashtra

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान आणि हरियाणा राज्यात पशुपालकांना नाकीनऊ आणणाऱ्या लंपी (Lumpy) या त्वचारोगाचा महाराष्ट्रातही फैलाव होत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये देखील घबराहट निर्माण झाली आहे. वाढत्या प्रादुर्भावाबरोबर या रोगाला घेऊन काही अफवाही पसरत आहेत. राजस्थानातील अनेक गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आता पसरत आहे. परिणामी शहरी भागातील दूध पुरवठ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे. मात्र, लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासूनही माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.

    लम्पी हा एक त्वचा रोग असून यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला असला तरी दूध उकळून पिल्यावर कोणताही धोका राहणार नाही.

    धार काढताना काळजी घ्या

    लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काही धोका नाही. मात्र, लम्पीग्रस्त (Lumpy) जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासूनही काही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने दिला आहे.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची (Lumpy) आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

     

  • लंपी चर्म रोगाचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही : आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

    हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी १० लाख लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नसल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह
    यांनी सांगितले.

    समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर कारवाई

    पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, राज्यात लंपी चर्म रोगाचा झपाट्याने प्रसार होतो आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. तसेच दूध हे मानवी आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे कांही समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर शासकीय कार्यवाही केली जाईल.

    मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी

    या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिका-यांनी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी. जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही (सोशल मिडियाचाही वापर करावा. लंपी आजारावर उपयुक्त असणा-या लस व औषधींची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. १ कोटी निधी उपलब्ध करून करावी. लंपी चर्म आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम घ्यावी. त्यासाठी मानधन तत्वावर त्यांच्या सेवा घ्याव्यात अशा सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.

    औषधांची फवारणी करावी

    हा रोग माशा, डास, गोचिड इ. किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि जिल्हा परिषद सेस यातून औषधे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्याविषयी श्री सिंह यांनी सांगितले.

    नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

    शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिसूचना प्रसिद्ध करून त्याअन्वयेप्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ (२००९ चा २७) याची कलमे (६), (७), (११), (१२) व (१३) या दूद्व्यारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, संपूर्ण महाराष्ट्र राज्य लंपी चर्म रोगाच्या बाबतीत “नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार गो व म्हैस प्रजातीची नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसेच गो व म्हैस प्रजातीचा बाजार भरविणे, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शने इ. बाबीस मनाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

    घाबरू नका काळजी घ्या

    सिंह यांनी सांगितले की,हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. आतापर्यंत या रोगामुळे भारतात दि. ९.०९.२०२२ पर्यंत ७०,१८१ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये ४५०६३, पंजाबमध्ये १६८६६, गुजरात मध्ये ५३४४ व हरियानामध्ये १८१० जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या आकडेवारीमुळे तसेच समाज माध्यमांमधून प्रसारित होणाच्या बातम्यांमुळे पशुपालकांमध्ये अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही, परंतु आवश्यक खबरदारी घ्यावी, असे सिंह यांनी पशुपालकांना आवाहन केले आहे.

    त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो

    लंपी चर्म रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये, तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

  • लंपीला अटकाव करण्यासाठी बैलगाडा शर्यतीलाही बंदी घातली पाहिजे : माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, कराड

    राजस्थान, हरियाणा, राज्यात धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातही लंपीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. सातारा जिल्ह्यातही लंपी चा प्रादुर्भाव झाला असून एकाच जनावराचा मृत्यू देखील झाला आहे. याचा संदर्भात कराड येथील शासकीय विश्रामगृह पाळीव जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी स्किन’ या संसर्गजन्य रोगाच्या उपाययोजनां संदर्भात पशुसंवर्धन विभागाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना लम्पी स्किन आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी बैलगाडी शर्यतींलाही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

    याबाबत बोलताना पाटील म्हणाले, लम्पी स्किनचा खिलारे गाई, खिलार बैल यांच्यावर जास्त परिणाम होतो, त्यांना पहिले लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सध्या जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. बैलगाडी शर्यंतींना परवानगी मिळाल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर खिलार जातीच्या बैलाच्या शर्यंती होत आहेत. तेव्हा शर्यंतीमुळे जनावरे एकत्रित येण्याचे मोठे प्रमाण बैलगाडी शर्यंतीमुळे होत आहे. तेव्हा लम्पी स्किन आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी बैलगाडी शर्यतींही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

    या संसर्गजन्य रोगविषयी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजचे आहे, त्यासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या गावी शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यावंर जाऊन आवश्यकत्या उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचना आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केल्या.

    त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीस कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.अनिल देशपांडे, सहाय्यक आयुक्त लघु पशुचिकित्सालय कराड डॉ. बी. डी. बोर्डे, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती कराड डॉ. दुर्गदास उंडेगांवकर, सर्व पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.