Category: बातम्या

  • सातारा जिल्ह्यात लंम्पीचा प्रादुर्भाव; तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या मंत्री देसाईंच्या सूचना

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सातारा

    लंम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची सद्यस्थितीचा आढावा श्री. देसाई यांनी मंत्रालय, मुंबई येथून दूरदृश्यप्रणाली द्वारे घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (दूरदृश्यप्रणाली द्वारे), सातारा जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    देसाई म्हणाले, लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे. ज्या गावांमधील पशुधनास लंम्पी आजारची लागण झाल्याचे समजतात तात्काळ भेट देवून पशुधनास उपचार करावे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने सज्ज रहावे. लंम्पी आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाईल. जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास लंम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून औषधोपचार करावेत, असेही आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यात लंम्पी चर्म रोगाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

    जिल्ह्यात 46 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून त्यापैकी 17 हजार 241 लसमात्रांचा वापर करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले. 26 हजार 659 लसमात्रा शिल्लक असून त्याद्वारे लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. तसेच पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे 2 लाख लसमात्रांची मागणी करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

  • लंपी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई मिळवी : अजित पवार

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या त्वचारोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. पशुधनांमधील वाढता संसर्ग रोखण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

    सरकारकडून भरपाई मिळावी

    पुढे बोलताना ते म्हणाले, ‘लम्पी स्कीन’ आजाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात राज्यात दूधउत्पादनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, ते राज्याला परवडणारे नाही, असेही पवार म्हणाले. ‘लम्पी स्कीन’ आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी. पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये. या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

    दरम्यान, देशातील राजस्थान, पंजाब, हरियानासारख्या राज्यानंतर महाराष्ट्रातील पशुधनालाहीविषाणूजन्य ‘लम्पी स्कीन’चा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यांतल्या ५९ तालुक्यांत हजारो जनावरे या आजाराने ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

     

     

  • अखेर असे काय घडले की महाराष्ट्रातील शेतकरी ‘नाफेड’ वर आहेत नाराज ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. गेल्या चार महिन्यांपासून कांद्याचे भाव शेतकऱ्यांना रडवत आहेत. जास्त किंमत असूनही त्यांना व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागतो आहे.नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाला (नाफेड) कमी भाव मिळत असल्याबद्दल संतप्त शेतकरीही आरोप करत आहेत. ते त्याच्या व्यवस्थापनाला शिव्या देत आहेत. कारण सहकारी संस्था असूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी नाफेडने निम्म्या भावाने कांदा खरेदी केला. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही कमी भावात कांदा खरेदी करण्याची संधी मिळाली.

    नाफेडची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 रोजी गांधी जयंतीनिमित्त करण्यात आली. बहुराज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि कृषी मालाच्या विपणनाला चालना मिळावी या उद्देशाने नाफेडची स्थापना करण्यात आली. पण आज महाराष्ट्रातील शेतकरी या संस्थेच्या कारनाम्याबद्दल संतप्त आहे. गतवर्षीच्या तुलनेत सर्वांचीच महागाई वाढली असली तरी नाफेडच्या दृष्टीने महागाई कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्या भावाने त्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला आहे. महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख कांदा उत्पादक शेतकरी यंदा कमी भावाच्या कचाट्यात सापडले आहेत.

    नाफेडविरोधात नाराजीचे कारण काय?

    महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी नाफेडची खरडपट्टी काढली आहे. ते म्हणाले की, कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडचा वापर दुधारी तलवार म्हणून केला आहे. गतवर्षी नाफेडमार्फत 23 ते 24 रुपये किलोने कांदा खरेदी करण्यात आला होता. मात्र, यंदा तोच कांदा 10 ते 12 रुपये किलोने खरेदी करण्यात आला आहे. नाफेडने कांद्याच्या बाजारभावात कपात केल्याने व्यापारी वर्गालाही कमी भावाने कांदा खरेदी करावा लागला.

    सरकार कांद्याची निर्यात का करत नाही?

    शिल्लक राहिलेल्या किंवा साठवलेल्या कांद्याला किमान बाजारात चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण त्याची आशाही धुळीस मिळाली. बहुतांश शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा खराब वातावरणामुळे सडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. जानेवारी महिन्यातच यंदा कांदा लागवड वाढण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडे कांद्याची निर्यात वाढावी आणि निर्यातीला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सातत्याने प्रयत्न केले. मात्र केंद्राच्या दुर्लक्षामुळे कांद्याचे बंपर उत्पादन होऊनही मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होऊ शकली नाही.

    शेतकऱ्यांना काय भाव मिळतोय?

    महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, कांद्याचा उत्पादन खर्च 16 ते 18 रुपये किलोवर पोहोचत आहे. कांदा लागवडीसाठी लागणारा निविष्ठांचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे. मात्र, कांद्याला सरासरी 1 ते 5 ते 7 रुपये भाव मिळत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार? कांद्याच्या भावात घसरण होण्यास नाफेडही जबाबदार आहे.

     

     

     

  • NDRF च्या निकषाने शेतकऱ्यांना मदत द्या; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी

    जुलै महिन्यातील सततच्या पाऊस तर ऑगस्ट महिन्यातील 25 दिवसाच्या पावसाचा खंडामुळे पिके सुकून गेली असुन खरिप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत २५ % विमा अग्रीम व एनडीआरफ च्या निकषाने मदत करावी अशी मागणी वाघाळा येथील सरपंच बंटी घुंबरे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

    सोमवार १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , वाघाळा गाव पाथरी मंडळामध्ये येत असून ते पाथरी पासुन दक्षिणेश 18 किमी आहे. तर बाभळगाव मंडळा पासुन 5 किमी अंतरावर आहे. जुलै महिन्यातील सततच्या पावसामुळे सोयाबीन कापूस , तुर , मुग , पिके पिवळी पडून समाधानकारक वाढ झाली नाही नंतर ऑगस्ट महिन्यात 25 दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे वरील पिके सुकून गेली आहेत. त्यात पिकाचे नजरी 60 ते 70 टक्के नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्यावर अस्मानी संकट आले असुन शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आला आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकर्याना एन डी आर एफ ( NDRF ) च्या तीन हेक्टर च्या मर्यादेत पंचनामे करून विमा कंपनीला 25 % टक्के अग्रिम रक्कम देण्यास भाग पड़ावे अशी करण्यात आली आहे .

    दिलेल्या निवेदनावर सरपंच बंटी घुंबरे , विजयकुमार घुंबरे ,पद्माकर मोकाशे ,दत्तराव नागमोडे यांच्यासह वाघाळा येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

  • अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी पार पडली या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे अतिवृष्टी बाधित किंवा आपत्ती प्रवण गावांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

    मागच्या दोन तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान राज्यात होत आहे. त्या धर्तीवर शिंदे सरकारने अतिवृष्टी बाधित किंवा आपत्ती प्रवण गावांचं पुनर्वसन करण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या निर्णयासंदर्भात कोणत्या अटी आणि नियम असतील हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

    कोविडकाळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना मंत्रिमंडळाचा दिलासा.सार्वजनिक आरोग्यमधील भरतीवेळी कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांची गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
    दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

    १)अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार. नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण
    २)नाशिक जिल्हयातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारीत प्रशासकीय मान्यता.
    ३)नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास मान्यता.
    ४)महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ.
    ५)केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करण्यासाठी योजना राबविणार.
    ६)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर २०२२ पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार

    दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. वेगाने फोफावणाऱ्या राज्यातील लंपी रोगाबाबत आपापल्या भागातील आजार रोखण्यावर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. ‘राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले असून या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष देण्याच्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

    पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर लम्पी आजाराबाबत मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • अंगावर वीज पडून दोन शेतकरी जखमी तर एकाचा जागीच मृत्यू

    हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यातल्या विविध भागात विजांसह पाऊस पडतो आहे. दरम्यान औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंगावर वीज पडल्यामुळे दोघे शेतकरी जखमी झाले असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की. ही घटना औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात घडली आहे. नादरपूर शिवारातील गट न. 447 मध्ये गुरं चारून परतताना नामदेव शेनफडू निकम यांच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे त्यांचे जागीच मृत्यू झाला. सोबतच त्यांच्या बाजूला असलेले प्रकाश निकम आणि दिपक निकम यांच्या अंगावर देखील विज कोसळल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर पिशोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. नामदेव निकम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

    दरम्यान एकाच गावातील तिघांच्या अंगावर वीज पडल्याने नादरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच तिघांपैकी नामदेव शेनफडू निकम यांचे मृत्यू झाल्याने गावात शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. नामदेव यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने निकम कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

     

  • सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 55 जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    राज्यात देखील जनावरांना होणाऱ्या लम्पी रोगाचा मोठा प्रसार होतो आहे. सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील फलटण, खटाव, सातारा, कराड तालुक्यात एकूण 55 जनावरे बाधित झाले आहेत यामध्ये 45 गाईंचा तर 10 बैलांचा समावेश आहे.

    यासाठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभाग सज्ज झाला असून ज्या ठिकाणी जनावरांमध्ये त्वचा रोगाचे संक्रमण दिसून येतय. त्या परिसरातील 5 किलोमीटर भागात जनावरांना लसीकरण केले जात आहे.जिल्ह्यातील 9 गावांमध्ये आढळलेल्या जनावरामध्ये एकही गाई किंवा बैल दगावला नसून पशुपालकांनी घाबरून न जाता या आजाराबाबत लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त अंकुश परिहार यांनी केलय.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

    १) लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • अचानक पाण्याचा लोंढा आला, तब्बल 700 पोती आले ट्रॅक्टरसह वाहून गेले ; शेतकऱ्यांचे 20 लाखांचे नुकसान

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील पेरले येथे अचानक नदीला पाणी आल्यामुळे तब्बल ७०० पोती आले व ट्रॅक्टर तारळी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील पेरले येथील विक्रम सिंह गुलाबराव कदम व युवराज लक्ष्मण जाधव हे आपल्या शेतातील तब्बल सातशे ते आठशे पोती आले ट्रॅक्टर मध्ये भरून तारळी नदीत धुण्यासाठी गेले होते.

    शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते तारळी नदीत गेले होते त्यावेळी नदीत पाणी कमी असल्याने ट्रॅक्टर पाण्यात उभा करून ते आले धुत होते दरम्यान याचवेळी अचानक जोरात पाऊस पडल्याने तारळी नदीत पाण्याचा लोंढा आला आणि पाणी वाढले यामुळे आल्यासह ट्रॅक्टर पाण्यात बुडाला व यामधील सुमारे आठशे पोती म्हणजेच एकूण सुमारे 30 हजार किलो आले वाहून गेले. यामुळे विक्रम सिंह कदम व युवराज जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यामध्ये विक्रम सिंह कदम यांची आले भरलेली सहाशे पोती तर युवराज जाधव यांची सुमारे 100 पोती होती..

    या शेतकऱ्यांसह लोकांनी वाहून जाणारे आले वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांना यश आले नाही दरम्यान पाण्याची पातळी अद्यापही जास्त असल्याने जॉन डीअर ट्रॅक्टर व ट्रॉली अद्यापही नदीपात्रातच आहे. अचानक लोंढा आल्याने आल्यासह ट्रॅक्टर बुडाला ही घटना गावात समजतात पेरले पुलावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

     

  • मोठी बातमी ! PM Kisan प्रमाणे राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार…




    मोठी बातमी ! PM Kisan प्रमाणे राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार… | Hello Krushi










































    हॅलो कृषी ऑनलाईन : शिंदे – फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून योजनांचा धडाकाच लावला आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकरी आत्महत्या रोखण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या साठी अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्रातील पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री किसान योजना’ राज्यात लागू केली जाणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचेअनुदान दिले जाणार असल्याची माहिती आहे.

    अर्थसंकल्पात तरतूद

    मागच्या तीन दिवसापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असून. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.या आर्थिक वर्षात बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेद्वारे सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

    दरम्यान या योजनेबाबतचे नियम आणि पात्रता अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. या योजनेमुळे शेतकर्यांना आर्थिक फायदा होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

    error: Content is protected !!





  • ‘लंम्पी’ला घाबरू नका, दवाखान्याशी संपर्क करा; पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांचे आवाहन

    हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा

    लंम्पी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जनावरांना आवश्यकेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असून वेळीच उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो. पशुपालकांनी घाबरुन न जाता नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार, व जिल्हा परिषद सातारचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

    रोग किटकांपासून पसरणारा लंम्पी त्वचारोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. सातारा जिल्हात फलटण तालुक्यातील खामगांव, जिंती, फडतरवाडी, चव्हाणवाडी व सातारा तालुक्यातील महागांव, कोडोली (पांढरवाडी ), खटाव तालुक्यात अनपटवाडी व मानेवस्ती कराड तालुक्यात वाघेरी अशी नऊ गावास लागण झाली आहे. एकूण 45 गाय व 10 बैल, अश्या 55 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

    प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. पशुमध्ये या रोगांची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज संस्था यांनी सदरची माहिती नजिकच्या पशुवैदयकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार, प्राण्याच्या शर्यती व वाहतूकीवर निर्बंध लागू केले आहेत.

    येथे करा संपर्क

    हा रोग संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता पशुपालकांनी बाह्य किटकांवर नियंत्रण,जैव सुरक्षा, निर्जतुंक द्रावणाच्या कीटक व नाशकांची परिसरात फवारणी इत्यादी आवश्यक या बाबीची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. लंम्पी त्वचा रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा टोल फ्री क्र. 18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.