Category: Crop management

  • जाणून घ्या, तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन कसे करायचे ?




    जाणून घ्या, तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन कसे करायचे ? | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या तुरीला चांगला भाव मिळत आहे. खरीप हंगामातील तूर अद्यापही शेतात आहे. मात्र कधी पाऊस, कधी ऊन, अशा बदलत्या वातावरणामुळे तूर पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. आजच्या लेखात आपण तुरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती घेऊया…

    लक्षणे

    खोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्धोरा रोग आहे.

    उपाय

    त्यासाठी २५ ग्रॅम मेटालॅक्झील एम ४ टक्के+ मॅन्कोझेब ६४ टक्के (रिडोमील गोल्ड)(संयुक्त बुरशीनाशक) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी व आळवणी करावी.

    error: Content is protected !!





  • सद्य हवामान स्थितीत कसे कराल पीक व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

    हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सद्य हवामान स्थिती नुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    कापूस : कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा डायफेन्थुरॉन 50% 240 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    तूर : तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    मुग/उडीद : काढणी केलेल्या शेंगा मळणी केलेल्या मुग/उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

    भुईमूग : उशीरा पेरणी केलेल्या भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जेथे शक्य आहे तेथे रब्बी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी भुईमूग पिकाची पेरणी 30 सप्टेंबर पर्यंत करावी.

    मका : काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी.

    ज्वारी : जेथे शक्य आहे तेथे रब्बी ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी.

    रब्बी सूर्यफूल : जेथे शक्य आहे तेथे रब्बी सुर्यफुल पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी सुर्यफलाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी.

     

  • बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग आणि किडींचा हल्ला; कसे कराल व्यवस्थापन ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    1)सोयाबीन : उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारावे.

    २)खरीप ज्वारी : पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा मॅलाथिऑन 5% भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे धुरळणी करावी किंवा मॅलाथिऑन 50% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ३)ऊस : पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    ४)हळद : हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

    ५) हरभरा : हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास कोरडे व थंड हवामान मानवते.

    ६) करडई : करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा आणि ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन काढणीनंतर करडई पीक घ्यावे.

  • सद्य हवामानात तयार पिकाची कशी काळजी घ्याल ? नवीन कोणती पिके घ्याल ? कृषी शास्त्रज्ञांनी दिला सल्ला

    हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सर्व शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची फवारणी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण पावसात औषध वाहून जाणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. या हंगामात उभ्या भात पिकामध्ये पाने पिवळी पडत असल्यास, त्याच्या प्रतिबंधासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन @ 15 ग्रॅम आणि कॅम्फर हायड्रॉक्साईड @ 400 ग्रॅम प्रति हेक्टरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी 10-12 दिवसांच्या अंतराने करावी.

    भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, या हंगामात बासमती भातामध्ये फॉल्स स्मट दिसण्याची खूप शक्यता आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे भाताचे दाणे आकाराने फुगतात व पिवळे पडतात. प्रतिबंधासाठी, ब्लाइटॉक्स ५० @ २.० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा फवारणी करावी.

    स्वीट कॉर्न ची पेरणी

    शेतकरी या हंगामात स्वीट कॉर्न (माधुरी, विन ऑरेंज) आणि बेबी कॉर्न (एचएम-4) पेरू शकतात. तयार केलेल्या शेतात मोहरीची पेरणी लवकर करता येते. सुधारित वाण- पुसा मोहरी-२८, पुसा तारक इ. बियाणे दर ५-२.० किलो. प्रति एकर. या हंगामात वाटाणा लवकर पेरता येतो. सुधारित वाण – पुसा प्रगती, बियाणे बुरशीनाशक कॅप्टन @ 2.0 ग्रॅम फवारणी करावी. प्रति किलो. बीज दरानुसार प्रक्रिया करा आणि त्यानंतर रायझोबियम टोचणी द्या. गूळ पाण्यात उकळून थंड करून बियांमध्ये रायझोबियम मिसळा, सुकण्यासाठी सावलीच्या जागी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पेरणी करा.

    सुधारित बियाणे पेरणी करावी

    भाजीपाला (टोमॅटो, वांगी, फ्लॉवर आणि कोबी) आणि फुलकोबी/फुलकोबीमधील डायमंड सॅक मॉथमध्ये डोके आणि फळ बोअररचे निरीक्षण करण्यासाठी @ 3-4/एकर फेरोमोन सापळा. ज्या शेतकऱ्यांची टोमॅटो, हिरवी मिरची, वांगी आणि फुलकोबीची रोपे तयार आहेत, त्यांनी हवामान लक्षात घेऊन उथळ वाफ्यावर (उथळ वाफ्यावर किंवा बांधावर) लागवड करावी. या हंगामात मुळा (पुसा चेटकी), पालक (पुसा भारती, अल्ग्रीन), राजगिरा (पुसा लाल चौलाई, पुसा किरण) इत्यादी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार असल्यास उंच बांधावर पेरणी करता येते. प्रमाणित किंवा सुधारित बियाण्यापासून पेरणी करावी.

     

     

     

  • धुळ्यात पावसाचा कपाशीला फटका; रोग किडींचा प्रादुर्भाव, कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने उघडीप दिली आहे मात्र काही भागात अद्यापही पाऊस पडतो आहे. धुळे जिल्यात देखील पाऊस झाल्यामुळे त्याचा मोठा फटका कपाशीच्या पिकांना बसला आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतीत आहे. यामुळं शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

    धुळे तालुक्यात तसेच साक्री तालुक्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळं शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. पावसामुळं कपाशीच्या बोंडांचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार धुळे तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्राला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी धुळे तालुक्यात 1 लाख 7 हजार 109 हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती त्यात 77 हजार 295 हेक्टरवर कापूस होता. यंदा 1 लाख 747 हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी तब्बल 84 हजार 961 हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या लागवडीचे क्षेत्र अकरा हजार हेक्टरनं वाढलं आहे.

    मागील दोन वर्षात कापसाला चांगला दर मिळत असल्यामुळे यंदा देखील कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. मागील वर्षी देखील पावसामुळे कापसाच्या उत्पन्नांत घट झाली होती. आता या वर्षी देखील तीच स्थिती होईल या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. आधीच जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यातूनही पीक कसेबसे वाचवल्यानंतर आता पुन्हा रोग आणि किडींचे संकट उभे आहे.

    सद्य स्थितीत कापूस पिकातील व्यवस्थापन

    –कापूस पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.
    –कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
    –कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून तिन दिवसानंतर पावसाची उघाड बघून फवारावे.

     

  • खरिपातील कापसावर थ्रिप्स तर सोयाबीन वर लष्करी अळीचा हल्ला ;बळीराजा हवालदिल !

    हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी प्रतिनिधी

    खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाल्याने कापुस लाल झाला पडला असून दुसरीकडे सोयाबीन पिकावर लष्करी अळीने हल्लाबोल केला आहे .अतिवृष्टी व पावसाच्या खंडानंतर आधीच उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येणार असताना आता किटकांनी हल्ला केल्याने परभणी जिल्हातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

    जिल्हातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेली संकटाची मालिका थांबायचे नाव घेत नाहीये .आधी मान्सूनचे उशिरा आगमन झाले त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या . त्यात अतिवृष्टी पावसाचा खंड यामुळे जिल्ह्यातील शेतीशिरात पेरणी केलेले क्षेत्र यातून मिळणारे अपेक्षित उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.

    आपण जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्राची प्रतिनिधी माहिती घेतल्यानंतर जिल्ह्याचे चित्र याविषयी कल्पना येईल .मागील आठवड्यात खरिपातील पावसाच्या खंडानंतर शेतकऱ्यांना विमा अग्रीम देण्यासाठी ५२ महसूल मंडळापैकी आठ महसूल मंडळांची निवड करण्यात आली आहे .त्यामध्ये निकषांमध्ये बसत असतानाही पाथरी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळ वगळण्यात आले आहेत नेमकी काय परिस्थिती पाथरी तालुक्यातील महसूल मंडळामध्ये आहे याविषयी आपण घेतलेला हा मागवा व सद्य परिस्थिती.

    यंदा पाथरी तालूक्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या प्रस्तावित क्षेत्रापैकी ऊस वगळता ७१ .७२% क्षेत्रावर म्हणजे ३७ हजार ३८० हेक्टर हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण केली .यामध्ये सर्वाधिक १६ हजार ६५४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी तर मागील वर्षी मिळालेल्या चांगल्या दरामुळे १६ हजार ४३२ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती.

    जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. सततच्या पावसाने खरिपात पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटल्या गेली .ही पिके कशीबशी सावरत असताना ऐन फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये ऑगष्ट महिण्यात पावसाने मोठा खंड दिला .१० ऑगस्ट पासून ते ५ सप्टेंबर पर्यंत तालुक्यात येणाऱ्या चारही महसूल मंडळांमध्ये यावेळी पावसाने ओढ दिली होती .या खंडामुळे फुल अवस्थेत असणाऱ्या सोयाबीनला मोठा फटका बसला तर कापसामध्ये ही पातेगळ होऊन स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केलेली मेहनत वाया गेली .आस्मानी संकटापुढे स्थानिक शेतकरी हातबल होता दरम्यान अग्रीम विमा मिळेल अशा आशेवर असणारा शेतकरी चारही महसूल मंडळ अग्रीम विमा देण्यातून वगळण्यात आल्याने सुलतानी संकटाने होरपळून निघाला.

    दरम्यान ५ सप्टेंबर पासून तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये पावसाचे जोरदार पुनरागमन झाले होते .दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून शेत शिवारात मात्र सर्वच पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या फवारण्या करूनही कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाला असून यामुळे कापूस लाल पडला आहे तर कापसाची पातेगळ मोठ्या प्रमाणात झाल्याने कापसामध्ये ४०% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत .महागड्या फवारण्या करूनही हा रोग काही आटोक्यात येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत .तर दुसरीकडे सर्वाधिक पेरणी क्षेत्र असलेल्या फुलगळ होऊन उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक हा बुरशीजन्य रोग व मोठ्या प्रमाणात पाणी खाणाऱ्या लष्करी अळीचा हल्ला झाल्या असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे . सततच्या या संकटांच्या मालिकेने स्थानिक शेतकरी मात्र हातबल झाला असुन व्यथा सांगावी तरी कोणाला ? असा त्याच्यापुढे प्रश्न पडला आहे .

  • सद्य हवामान स्थितीत फळबागा,भाजीपाला,चारापिकांची कशी घ्याल काळजी ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    फळबागेचे व्‍यवस्‍थापन

    संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत फळ गळ दिसून येत असल्यास एनएए 4 मिली + चिलेटेड झिंक 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत फळ वाढीसाठी 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चिकू बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

    भाजीपाला

    भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

    चारा पिके

    चारा पिकासाठी उशीरा लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. चारापिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

    फुलशेती

    गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुलपिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

  • ज्वारीवर लष्करी आळीचा हल्ला तर सोयाबीनवर मोझॅक; असे करा वावरातल्या पिकांचे व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    सोयाबीन : सोयाबीन पिक सध्या फुलोरा ते शेंगा वाढीच्या अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास सोयाबीन पिकास संरक्षित पाणी द्यावे. कोरडवाहू सांयाबीन पिकात पोटॅशियम नायट्रेट 1% म्हणजेच 13:00:45 खताची (100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे तात्काळ उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर 15-20 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे.

    खरीप ज्वारी : उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 % 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिक सध्या पोटरी अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे‍.

    बाजरी : बाजरी पिक सध्या पोटरी अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे‍.

    ऊस : ऊस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.

    हळद: पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

     

  • ढगाळ हवामानामुळे पिकांत कीड, रोगांचा प्रादुर्भाव; तज्ञांच्या सल्ल्याने करा पीक व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    कापूस : कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    तूर : तुर पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    भुईमूग : भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे ड्रम फिरवावे. त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते.

    मका : उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकाच्या कणसांची काढणी करून घ्यावी.

     

  • खरीप पिकामध्ये आंतरमशागतीचे नियोजन कसे कराल?

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. सध्याच्या स्थितीत पिकांमध्ये आंतरमशागत महत्वाची आहे. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते. याचा फायदा पिकाबरोबरच जमिनीतील सूक्ष्म जिवांच्या कार्यासाठी होतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप पिकातील आंतरमशागतीचे महत्व आणि नियोजनाविषयी पुढील माहिती दिली आहे.

    पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच मातीतील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी करावी. तणांच्या प्रादुर्भावानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार साधारणतः २ ते ३ कोळपण्या नंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाचव्या-सहाव्या आठवड्यापर्यंत कोळपणी करावी.

    पेरणी झाल्यानंतर पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार विशेषतः नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो. खुरपणी किंवा कोळपणी झाल्यानंतर खत मातीत मिसळले जाईल या पद्धतीने द्यावे. मात्र खत दिल्यानंतर पिकाला पाणी द्यावे.

    पिकांच्या दोन ओळीत सेंद्रिय पदार्थांचे, उदा. गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, तुरकाठ्या, ज्वारीची धसकटे, उसाचे पाचट, पिकांचा टाकाऊ भाग इत्यादी आच्छादन म्हणून वापरावे. साधारणपणे प्रती हेक्टरी पाच टन या प्रमाणात सेंद्रिय आच्छादकाचा वापर करावा.

    आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, जमिनीचे तापमान नियंत्रित राखणे इत्यादी फायदे होतात.

    खांदणी आंतरमशागत

    खांदणी मुख्यतः ऊस, आले, बटाटा, हळद, भुईमूग इत्यादी पिकांसाठी केली जाते. उसासाठी खांदणी ही महत्त्वाची आंतरमशागत आहे, यामुळे पाणी एकसारखे बसते, शिवाय पीक लोळत नाही. उसासाठी दोन ते अडीच महिन्यांनी बाळबांधणी व ४ ते ५ महिन्याचे पीक होताच पक्की बांधणी करावी.

    आंतरमशागतीचे नियोजन

    आंतरमशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशीमध्ये दर दोन ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. या सऱ्या मुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपयोग होतो. तुरीच्या जोमदार वाढीसाठी १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी.अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस शेत तणविरहीत ठेवावे.

    –सोयाबीन पिकाची लागवड रुंद वरंबा सरीवर केली असल्यास रिकाम्या सरीमध्ये तण राहणार नाही याची काळजी घ्यावी.

    –हुलगा, मटकी, चवळी आणि राजमा ही पिके २० ते २५ दिवांचे असतांना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.

    –भुईमुग पिकात, १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व दोन खुरपण्या घ्याव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरवात झाल्यानंतर आंतरमशागत करू नये.

    –सूर्यफूल पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक खुरपणी करावी, दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.

    –भाजीपाला पिकांमध्ये आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत. आवश्यकतेनुसार वर खतांच्या मात्रा द्याव्यात. वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारावी.