Category: Crop Managemnet

  • वावरतील सोयाबीन कापूस, पिकांची काय घ्यावी काळजी ? रब्बी मका, ज्वारीसाठी कुठले वाण वापराल ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    १) कापूस

    पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा डायफेन्थुरॉन 50% 240 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    २)सोयाबीन :

    काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची स्वच्छ हवामानात काढणी करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी किंवा ढिग करून झाकून ठेवावे.

    ३)तूर :

    तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. शक्य असेल तेथे तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

    मका वाण :

    रब्बी हंगामात मका पिकाच्या पेरणीसाठी धवन, शक्ती-1, करवीर, डेक्क्न-105 इत्यादी वाणांपैकी एका वाणाची निवड करावी.

    रब्बी ज्वारी:

    पेरणीसाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी मोती (एसपीव्ही-1411), परभणी ज्योती (एसपीव्ही-1595/सीएसव्ही-18), पीकेव्ही क्रांती, फुले यशोदा, सीएसव्ही-22 आर, सीएसव्ही-29आर (एसपीव्ही-2033), मालदांडी (एम35-1), फुल रेवती (एसपीव्ही-2048), फुले सुचित्रा इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

    रब्बी सुर्यफुल :

    पेरणीसाठी लातूर सुर्यफुल-8, फुले भास्कर, मॉर्डन, लातूर संकरित सुर्यफुल-171, लातूर संकरित सुर्यफुल-35 इत्यादी वाणापैकी वाणाची निवड करावी.

  • असे करा कपाशीवरील रसशोषक किडींचे व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, मागच्या काही दिवसांपासून कापूस बाजारात चांगलीच तेजी आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा कापूस लागवडीकडे आहे. यंदाच्या खरिपातही कापूस लागवडीला प्राधान्य दिले जाते आहे. मात्र हवामान बदलामुळे कापसावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पन्नात घट येते. आजच्या लेखात आपण कपाशीवरील रसशोषक किडींचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती घेऊया…

    १) पांढरी माशी :

    प्रौढ माशी आकाराने लहान शरीरावर पिवळसर झाक असून पंख पांढरे असतात. डोक्यावर दोन तांबडे ठिपके असतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषतात. अशी पाने कोमेजतात. अधिक प्रादुर्भावामध्ये पाने लालसर ठिसूळ होऊन शेवटी वाळतात. पिल्लांच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट द्रवामुळे पानावर काळी बुरशी वाढते. तसेच पांढरी माशी रोगाचा प्रसार करते. या किडीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशीवर सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतो. नोव्हेंबर महिन्यात अधिक प्रादुर्भाव दिसून येतो.

    २) मावा :

    ही कीड रंगाने पिवळसर किंवा फिकट हिरवी आणि आकाराने अंडाकृती असते. मावा व त्याची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून रस शोषतात. अशी पाने निस्तेज होऊन आक्रसतात, खालील बाजूला मुरगळलेली दिसतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. मावा किडीच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट द्रवामुळे पाने चिकट बनतात. कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून, पानाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण होतात.

    ३)तुडतुडे :

    प्रौढ व पिल्ले फिकट हिरवे, पाचरी प्रमाणे असतात. समोरच्या पंखावर एक काळा ठिपका असतो. तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात. तुडतुड्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तिरके चालत चटकन उडी मारतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषतात. त्यामुळे पाने प्रथम बाजूने पिवळसर होऊन नंतर तपकिरी होतात. अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण पाने लाल तांबडी, त्यांच्या कडा मुरगळलेली दिसतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते. अशा झाडांना पाते, फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात.

    आर्थिक नुकसान पातळी :

    – १० मावा प्रति पान,

    – ८ ते १० प्रौढ पांढरी माशी किंवा २० पिल्ले प्रति पान,

    – २ ते ३ तुडतुडे प्रति पान

    आढळून आल्यानंतर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. त्यापूर्वी एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करत राहावा.

    कसे करावे व्यवस्थापन ?

    -वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून नष्ट करावा.

    -खुरपणी, कोळपणी करून पीक ताणविरहित ठेवावे.

    -माती परिक्षणानुसार नत्र खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. त्यामुळे कपाशीची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही. अशा पिकावर कीड कमी प्रमाणात राहील.

    -निसर्गतः रसशोषक किडीवर उपजीविका करणारे मित्र कीटक उदा. ढालकीटक, सिरफिड माशी, क्रायसोपा, ॲनसियस असे परोपजीवी कीटक आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. मित्र किटकांचे संवर्धन होईल.

    – पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.

    -पीक वाढीच्या सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

    -किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास खालील पैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)

    फ्लोनिकॅमिड (५० टक्के डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा

    थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा

    ब्युप्रोफेजीन (२५ टक्के एससी) २ मिलि किंवा

    फिप्रोनील (५ टक्के एससी) ३ मिलि किंवा

    डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्युपी) १.२ ग्रॅम किंवा

    ॲसीफेट (५० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रीड (१.८ एसपी) (संयुक्त कीटकनाशक) २ ग्रॅम

    विशेषतः फूल किडीच्या व्यवस्थापनाकरिता,

    फिप्रोनिल (५ टक्के एससी) ३ मिलि किंवा स्पिनेटोरम (११.७ टक्के एससी) ०.८४ मिलि

    टीप : फवारणीसाठी शुद्ध पाणी वापरावे.

    शेतात कीटकनाशकांचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.

    फवारणीसाठीच्या मात्रा हाय व्हॉल्यूम पंपासाठीच्या आहेत.

    संपर्क – ०२४५२-२२८२३५

    (कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)