Category: FRP

  • राज्यातील ‘हा’ साखर कारखाना देणार एकरकमी FRP

    हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापुरातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी हंगामासाठी कारखान्याच्या परंपरेनुसार एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व श्रीदत्त साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

    यावेळी बोलताना पाटील म्हणाले, सभासदांच्या विश्वासास पात्र राहून आणि कामगारांच्या पाठबळावर दत्त साखर कारखान्याने चौफेर प्रगती साधली आहे. यावर्षी कारखान्याकडे पुरेसा ऊस उपलब्ध होणार असून यंदाचा गळीत हंगामात जादा क्षमतेने गाळप करण्याचा मानस आहे. ते म्हणाले, की केंद्र शासनाने हंगामापूर्वी साखर निर्यातीबाबतचे धोरण जाहीर करणे आवश्यक आहे,वार्षिक सभेत कारखान्याचा शेअर १० हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करण्याच्या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली.

    पुढे बोलताना ते म्हणाले, साखरेला केंद्र शासनाने प्रति क्विंटल तीन हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत ठरवावी. कारखाना कार्यक्षेत्रातील १९ गावांमधील क्षारमुक्त प्रकल्प राबविण्यात आला असून यामध्ये तीन हजार एकर जमीन टिकाऊ झाली आहे. क्षारमुक्त प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना एकरी २४ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. ऊर्जांकूर प्रकल्प हा लवकरच कर्जमुक्त होणार असून तो कारखान्याच्या मालकीचा झाल्यानंतर ऊस उत्पादक सभासदांना त्याचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. त्याचबरोबर या सभेत सभासदांनी विचारलेल्या लेखी स्वरूपातील प्रश्नांना व्यवस्थापनाने उत्तरे दिली. व्हाइस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलराव यादव यांच्यासह संचालक उपस्थित होते.

  • ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला, ‘जागर एफआरपीचा’ अभियान

    हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस हंगामाची दिशा ठरवण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे.

    ‘जागर एफआरपीचा’ अभियान

    याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘चार वर्षांपासून एफआरपीचा दर २७०० ते २९०० इतका आहे, मात्र खतांचे वाढलेले दर, मजुरी लक्षात घेता आता एफआरपीची रक्कम वाढवून मिळणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने एफआरपीच्या रकमेत जी वाढ केली ती तोडणी, ओढणीमध्येच संपते. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या साखरेची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात झाली आहे.

    तसेच इथेनॉल आणि कच्च्या साखरेचे दरही अधिक आहेत. ब्राझीलमध्ये यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षात भारताच्या साखरेला जागतिक बाजारात चांगली मागणी असेल. हे सर्व पाहता साखर कारखान्यांना वाढीव एफआरपी देणे शक्य आहे. तसेच कारखाने जी उपउत्पादने बनवतात, त्याचीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आता वाढीव एफआरपी अधिक किती रक्कम हे १५ ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेत ठरेल.

    खतांचे आणि मजुरीचे वाढलेले दर आणि साखर कारखान्यांना झालेला नफा लक्षात घेऊन एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर)ची रक्कम अधिक मिळावी, अशी आमची मागणी असणार आहे. तसेच एफआरपीची रक्कम का वाढवून मिळावी यासाठी ९ ठिकाणी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान घेऊन या बाबत शेतकऱ्यांना जागरूक केले जाणार आहे.

    शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळेच पक्ष लुच्चे

    या बाबत प्रबोधन करण्यासाठी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान राबवले जाणार आहे. महाविकास आघाडीने एकरकमी एफआरपी न देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. नव्या सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय रद्द केले. फक्त एकरकमी एफआरपीचा निर्णय रद्द केला नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळेच पक्ष लुच्चे आहेत, असे शेट्टी म्हणाले.

     

  • राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील ऊस उत्पदक शेतकरी आणि कारखानदारांसाठी महत्वाची बातमी आहे. यांच्या वर्षी राज्यात गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक संपन्न झाली.

    यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना 42 हजार 650 कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक 98 टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

    138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

    यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे 14 लाख 87 हजार हेक्टरवर असून राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे 203 कारखाने सुरू होणार असून यंदा 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. महाराष्ट्राने गेल्या हंगामात 137.36 लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे.

    टन 3050 रुपये एफआरपी

    यंदाचा गाळप हंगाम सरासरी 160 दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी 10.25 टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन 3050 रुपये एफआरपी देण्यात येणार आहे. दरम्यान, देशात सध्या 60 लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात 30 लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून 100 लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा 60 लाख मेट्रीक टन आहे.

    325 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती

    इथेनॉल निर्मितीमध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा 35 टक्के आहे. पुढील वर्षी 325 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणा दरम्यान सांगण्यात आले. साखर निर्यातीबाबत खुला सर्वसाधारण परवान्याबाबत गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी उस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मिती आदीबाबत चर्चा करण्यात आली.

    या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

     

  • पूर्ण ‘एफआरपी’ शिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी

    हॅलो कृषी ऑनलाईन : या हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. इस्लामपूर येथे बुधवारी (ता. ७) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

    पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी गेल्या वेळी दिलेली एफआरपी तुकड्याने दिली. ती पंधरा टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कारखान्यांनी तो पाळावा. कारखान्यांना चांगला दर मिळाला आहे. त्यांनी यंदा एफआरपीपेक्षा अजून २०० रुपये जादा द्यावेत आणि तेही हंगाम सुरू होण्यापूर्वी द्यावेत, अशी स्वाभामिनीची आग्रही भूमिका आहे. या हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही

    ते पुढे म्हणले , ‘‘केंद्र शासनाने निर्यात साखरेला चांगला भाव दिला आहे. कारखान्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे २०० रुपये वाढवून द्यावेत. कारखाने बिगर सभासदांकडून घेत असलेले पैसे बेकायदेशीर आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या ठेवींची मागणी करावी,’’ असे आवाहन शेट्टी यांनी केले.

    ‘‘साखर कारखान्यांद्वारे होणारी काटामारी गंभीर आहे. जवळपास एका खेपामागे दोन ते अडीच टन उसाची काटामारी होते. वर्षाला सरासरी ७० हजार टन केवळ काटामारीतून मिळतात. ही साखर काळ्या बाजारात विकली जाते. यातून एकट्या राज्याचा विचार केला तर २०० कोटींच्या वर जीएसटी सरकारचा बुडतो. शासनाने कारखान्यांच्या गोडाउनवर छापे टाकावेत म्हणजे बेहिशेबी साखर किती आहे, ते कळेल,’’ असेही शेट्टी म्हणाले.