Category: Grape Cultivation

  • सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेत उद्भवतिये घड कुजेची समस्या ? काय कराल उपाय ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्यासद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आजच्या लेखात आपण द्राक्ष घड कुजण्याच्या समस्येविषयी जाणून घेऊया…

    द्राक्ष घड कुजण्याची समस्या

    कधी होते कुजेची समस्या ?

    दोन ते तीन आठवड्यांपूर्वी फळछाटणी केलेल्या बागेत या वेळी काडीवर काडीवर निघालेल्या फुटींची संख्या जास्त असेल, तसेच फुटींची वाढही जास्त झालेली असेल. एका काडीवर साधारणतः चार ते पाच डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग केले जाते. या वेळी साधारणतः सात ते आठ पानांची अवस्था असेल. म्हणजेच प्रत्येक काडीवर ३५ ते ४० पाने असतील. वेलीवर असलेल्या काड्याची संख्या लक्षात घेता या वेळी प्री ब्लूम अवस्थेमध्ये दाट कॅनॉपी तयार झालेली आहे. कोरडे वातावरण असल्यास घडावर फारसे विपरीत परिणाम होणार नाहीत. मात्र सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे वाढलेल्या आर्द्रतेमुळे एकतर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढतो. किंवा कुजेची समस्या निर्माण होते.

    काय करावे उपाय ?

    १) प्री ब्लूम अवस्थेमध्ये घडात अजून देठ तयार झालेले नसले तरी घडावर पाणी साचून राहिल्यास तो घड कुजण्याची शक्यता वाढते. यासाठी वेळीच फेलफूट काढणे गरजेचे होते. या हंगामात सतत होत असलेल्या पावसाचा विचार करता काडीवर फेलफुटी शक्य तितक्या लवकर काढून घ्याव्यात.

    २)दरवर्षीच्या तुलनेत फुटींची संख्या कमी ठेवावी. कॅनॉपीमध्ये आर्द्रता कमी करण्याच्या दृष्टीने हे करणे अत्यंत गरजेचे असेल.

    ३) ज्या बागेत वाफसा परिस्थिती अजून आलेली नाही, अशा भागात काही काळ पाऊस सुरू असल्यास डाऊनी मिल्ड्यू, करपा किंवा जिवाणूजन्य करपा यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल. फळछाटणीनंतर १४ ते १७ दिवसांच्या कालावधीत फेलफुटी काढण्याला प्राधान्य द्यावे.

    ४)सतत झालेल्या पावसामुळे बोदामधून पाणी व त्यासोबत उपलब्ध अन्नद्रव्येही वाहून गेली असतील. अशा स्थितीमध्ये द्राक्ष वेल अशक्त होऊ शकते. वेलीला ताण बसतो. यामुळे कुजेची समस्याही वाढताना दिसते. यावर मात करण्यासाठी वेलीला सशक्त करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. झिंक, बोरॉन ची फवारणी प्रत्येकी अर्धा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घ्यावी. पालाश दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे एक ते दोन फवारण्या करून घ्याव्यात.

    ५)पाने पिवळी असलेल्या परिस्थिती वाढीचा जोम कमी असल्यास नत्रयुक्त किंवा नत्र स्फुरदयुक्त खतांची फवारणी करता येईल.
    फेलफुटी काढताना कोवळ्या काडीवर जखमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस सुरू असलेल्या परिस्थितीत या जखमेमुळे कुजेची किंवा रोगाची समस्या येण्याची शक्यता असेल. तेव्हा फेलफूट काढल्यानंतर लगेच बुरशीनाशकांची फवारणी करून घ्यावी.

     

  • द्राक्ष विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ‘ही’ आहे अंतिम तारीख; जाणून घ्या सर्व माहिती

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील द्राक्ष बागायतदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागेस नुकसान झाल्यास विमा कवच शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठरते. यंदाच्या वर्षी द्राक्ष विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ निश्चित करण्यात आली आहे.

    योजना द्राक्ष पिकासाठी अधिसूचित जिल्ह्यामधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनामार्फत उभारलेल्या संदर्भ हवामान केंद्रावरील आकडेवारी गृहीत धरण्यात येते.

    या योजनेअंतर्गत दोन वर्षे वय झालेल्या द्राक्ष पिकासाठी राज्याचे दोन भाग केले असून, त्या त्या भागानुसार हवामान धोके व नुकसान भरपाई रक्कम यात बदल आहे. द्राक्ष पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण निश्‍चित केले आहे.

    द्राक्ष (अ) समाविष्ट जिल्हे ः नाशिक, नगर, धुळे, बुलडाणा

    द्राक्ष (ब ) समाविष्ट जिल्हे ः सांगली, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, सातारा, बीड, लातूर, नांदेड, कोल्हापूर

    टिप : विमाधारक शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे नुकसान झाल्यास ,नुकसान झाल्यापासून ७२ तासांचे आत नुकसानीची माहिती विमा कंपनीस / संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्‍चित केले जाणार आहे.

    शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता

    हवामान धोके—विमा संरक्षित रक्कम रुपये प्रति हेक्टर—शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर

    कमी तापमान,वेगाचा वारा, जादा तापमान—३,२०,०००—-१६०००

    गारपीट—१०६६६७ —-५३३४

    कोण घेऊ शकतो या योजनेत सहभाग ?

    १) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

    २) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

    ३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो , बँक पासबुक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

    ४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)

    ५) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

    ६) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांना ५ टक्क्यांपेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.

    ७) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.