Category: GroundNut Cultivation

  • कधीपर्यंत कराल रब्बी भुईमुगाची पेरणी? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरिपाच्या पिकांची काढणीची वेळ जवळ आली असून लवकरच काढणी पूर्ण होईल. काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी जमीन तयार केली जात आहे. जर तुम्ही यंदाच्या रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड करणार असाल तर ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. आजच्या लेखात रब्बी भुईमूग लागवडीविषयी जाणून घेऊया…

    रब्बी भुईमूग पिकाची पेरणी 30 सप्टेंबर पर्यंत करावी अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे.

    भुईमूग लागवडीसाठी जमीन

    भुईमूग लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, मऊ, भुसभुशीत, वाळूमिश्रित व सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. अशा जमिनीत आऱ्या सहज जाऊन शेंगा चांगल्या पोसतात. जमिनीमध्ये हवा खेळती राहून, मुळांना भरपूर हवा मिळते. मुळावरील नत्रांच्या गाठींची वाढ होते. भारी चिकण मातीच्या जमिनी ओलसरपणा कमी झाल्यावर कडक होतात. तसेच काढणीच्या वेळी शेंगा जमिनीत राहण्याची शक्‍यता असते. अशा जमिनीत भुईमुगाची लागवड करू नये.

    पेरणी

    रब्बी हंगामात भुईमुगाची १५ डिसेम्बर पूर्वी करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.

    वाण

    लागवडीसाठी एस.बी. – ११, टी.ए.जी. – २४, टी.जी. – २६ या जातींचे हेक्‍टरी १०० किलो बियाणे लागते. तर फुले प्रगती, फुले व्यास, फुले उनप, जे.एल. – ५०१, फुले भारती या जातींचे हेक्‍टरी १२० ते १२५ किलो बियाणे लागते.

    बेजप्रक्रिया

    पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून त्वरित पेरावे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागून उगवण चांगली होते.