Category: Jowar

  • रब्बी ज्वारीची लागवड करताय ? जाणून घ्या कोणते वापराल वाण ? कशी कराल पेरणी ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरिपातील पिके आता काढणीला आली आहेत. आता लावकारच शेतकरी रब्बी पिकांच्या लागवडीकडे लक्ष घालायला सुरुवात करतील. आजच्या लेखात आपण जाणून घेउया रब्बी ज्वारी चे वाण आणि पेरणीबाबत माहिती…

    रब्बी ज्वारी:

    १) हलक्या जमिनीत (खोली ३० सें.मी पर्यंत) फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माऊली या जातींची निवड करावी.

    २) मध्यम जमिनीत (खोली ६० सेंमी.पर्यंत) फुले सुचित्रा, फुले चित्रा, फुले माउली, परभणी मोती, मालदांडी ३५-१ या जातींची निवड करावी.

    ३) भारी जमिनीत (खोली ६० सेंमी.पेक्षा जास्त) फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही-२२, पीकेव्ही-क्रांती, परभणी मोती आणि संकरित जाती ः-सीएसएच १५, सीएसएच १९, या जातींचा वापर करावा.
    ४) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधकाची (३०० मेष) प्रक्रिया करावी. त्यामुळे काणी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.

    ५) पेरणी १५ सप्टेंबरच्या अगोदर किंवा १५ ऑक्टोबरनंतर केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून ज्वारीची पेरणी योग्य वेळी करावी.

    ६) पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरावी. एकाच वेळी खत व बियाणे पेरावे. कोरडवाहू क्षेत्रात ४५ × १५ – २० सेंमी अंतरावर पेरणी करावी. हेक्टरी १० ते १२ बियाणे पेरणीसाठी पुरेसे होते.

    ७) कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या जमिनीत पेरणी करते वेळी हेक्टरी एक गोणी युरिया द्यावा. मध्यम खोल जमिनीमध्ये दीड ते दोन गोणी युरिया आणि अडीच गोणी स्फुरद द्यावे. भारी जमिनीस अडीच गोण्या युरिया आणि साडेतीन गोण्या स्फुरद द्यावे. कोरडवाहू जमिनीमध्ये संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.

    ८) बागायती क्षेत्रातील मध्यम खोल जमिनीमध्ये तीन गोण्या युरिया, पाच गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट व एक ते सव्वा गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. नत्र दोन हप्त्यांत, पेरणीच्या वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.

    कोळपणी महत्त्वाची…

    १) रब्बी हंगामातील पिकांमध्ये कोळपणीचा महत्त्वाची आहे. एक कोळपणी केली म्हणजे पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. कोरडवाहू रब्बी ज्वारीमध्ये तीन वेळेस कोळपणी करावी.

    २) पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे वाढणारे तण नष्ट करून त्यावाटे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

    ३) दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी. त्या वेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात, त्या कोळपणीमुळे बंद होतात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते.

    ४) तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्यांचे झाले असता दातेरी कोळप्याने करावी. दातेरी कोळपे मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. त्या वेळी जमिनीत ओल फार कमी असेल त्या वेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.

  • ज्वारीवर लष्करी आळीचा हल्ला तर सोयाबीनवर मोझॅक; असे करा वावरातल्या पिकांचे व्यवस्थापन

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्‍यवस्‍थापन

    सोयाबीन : सोयाबीन पिक सध्या फुलोरा ते शेंगा वाढीच्या अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास सोयाबीन पिकास संरक्षित पाणी द्यावे. कोरडवाहू सांयाबीन पिकात पोटॅशियम नायट्रेट 1% म्हणजेच 13:00:45 खताची (100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे तात्काळ उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर 15-20 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे.

    खरीप ज्वारी : उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 % 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिक सध्या पोटरी अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे‍.

    बाजरी : बाजरी पिक सध्या पोटरी अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे‍.

    ऊस : ऊस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.

    हळद: पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).