Category: Lumpy Disease

  • देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 15 राज्यांतील 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 75 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिक दुग्ध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील 17 जिल्हे प्रादुर्भावग्रस्त आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत

    लम्पीची लागण होताच गायींची दूध देण्याची क्षमता कमी होत आहे. तर काही ठिकाणी पूर्णपणे दुधाचा पुरवठा बंद होत आहे. राजस्थानातील सर्वाधिक लम्पी बाधित पाच जिल्ह्यांमध्ये दुधाचे उत्पादन 30 टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर गुजरातमधील दूध उत्पादनावर 10 टक्के परिणाम झाला आहे. तर पंजाबमध्ये दुधाचे उत्पादन 7 टक्क्यांनी घटले आहे. दरम्यान, पुरवठा कमी झाल्यानं दूध संघांनी दुधाच्या दरात दोन ते चार रुपयांची वाढ केली आहे.

    मिळालेल्या आकडेवारीनुसार, राजस्थानमधील 33 जिल्ह्यांमध्ये लम्पी आजाराचा प्रसार झाला आहे. तर गुजरातच्या 33 पैकी 26 जिल्ह्यांमध्ये या संसर्गाने कहर केला आहे. तर पंजाबमधील 23 जिल्हे आणि हरियाणातील सर्व 22 आणि उत्तर प्रदेशातील 21 जिल्हे याच्या विळख्यात आले आहेत. लम्पी आजारामुळं गाई पालनातून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आलं आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे दुधाचीही टंचाई निर्माण होत आहे.

    बाधित राज्यांची सरकारे पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. कारण हा संसर्ग पसरण्याचे कारण केवळ पावसामुळेच असल्याचे सांगितले जात आहे. पाऊस संपल्याने डास कमी होतील आणि लम्पीचा कहरही कमी होईल असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर लसीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. गायींना या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण केलं जात आहे.

  • लम्पीची दहशत ! प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    हॅलो कृषी ऑनलाईन : परराज्यात दहशत माजविणाऱ्या लम्पी या रोजगाची महाराष्ट्रात देखील प्रकरणे वाढली आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील पशुधनाला या रोगाची लागण झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये दिसून येत आहे. म्हणूनच खबरदारी म्हणून बीड आणि अहदनगरच्या जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनं सतर्क झाले असून . जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरुर कासार आणि पाटोदा या तालुक्यातील जनावरांचे बाजार पुढचे काही काळ बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. बीड जिल्ह्यातल्या धसवाडी येथे काही जनावरांमध्ये लंपी स्कीन आजार आढळून आल्याने जिल्हाभरातील इतर जनावरांना त्याची लागण होऊ नये म्हणून अंबाजोगाई, परळी, आष्टी आणि शिरुर तालुक्यासह पाटोदा येथील जनावरांचे बाजार भरवण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. यापूर्वी देखील या आजाराचा संसर्ग अनेक जनावरांना झाला होता. त्यामुळं हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याधिकाऱ्यांनी देखील जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    अंबाजोगाई तालुक्यातल्या धसवाडीमध्ये काही जनावरांना या लम्पी आजाराची लागण झाली असून, गायी आणि बैलांमध्ये या आजाराचा संक्रमण जास्त प्रमाणात होत आहे. या आजारामुळं जनावरांना तीव्र ताप येतो तर तहान भूक आणि रवंत करण्याची क्षमता देखील कमी होते. जनावरांमध्ये अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असा आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलं आहे.