Category: Lumpy In Maharashtra

  • सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 55 जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    राज्यात देखील जनावरांना होणाऱ्या लम्पी रोगाचा मोठा प्रसार होतो आहे. सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील फलटण, खटाव, सातारा, कराड तालुक्यात एकूण 55 जनावरे बाधित झाले आहेत यामध्ये 45 गाईंचा तर 10 बैलांचा समावेश आहे.

    यासाठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभाग सज्ज झाला असून ज्या ठिकाणी जनावरांमध्ये त्वचा रोगाचे संक्रमण दिसून येतय. त्या परिसरातील 5 किलोमीटर भागात जनावरांना लसीकरण केले जात आहे.जिल्ह्यातील 9 गावांमध्ये आढळलेल्या जनावरामध्ये एकही गाई किंवा बैल दगावला नसून पशुपालकांनी घाबरून न जाता या आजाराबाबत लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त अंकुश परिहार यांनी केलय.

    लम्पीची लक्षणे आणि बचाव

    १) लक्षणे

    १)या आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
    २)लसिकाग्रंथीना सूज येते.
    ३)सुरुवातीला जनावरांना ताप येतो.
    ४)दुधाचे प्रमाण कमी होते.
    ५)चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.
    ६)हळूहळू डोके, मान, मायांग, कास इत्यादी भागाच्या त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी येतात.
    ७)तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
    ८)डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
    ९)पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.

    काय घ्यावी काळजी ?

    लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

    १)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
    २)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
    ३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
    ४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
    ५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
    ६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
    ७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
    ८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
    ९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
    १०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

  • ‘लंम्पी’ला घाबरू नका, दवाखान्याशी संपर्क करा; पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांचे आवाहन

    हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा

    लंम्पी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जनावरांना आवश्यकेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असून वेळीच उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो. पशुपालकांनी घाबरुन न जाता नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार, व जिल्हा परिषद सातारचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

    रोग किटकांपासून पसरणारा लंम्पी त्वचारोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. सातारा जिल्हात फलटण तालुक्यातील खामगांव, जिंती, फडतरवाडी, चव्हाणवाडी व सातारा तालुक्यातील महागांव, कोडोली (पांढरवाडी ), खटाव तालुक्यात अनपटवाडी व मानेवस्ती कराड तालुक्यात वाघेरी अशी नऊ गावास लागण झाली आहे. एकूण 45 गाय व 10 बैल, अश्या 55 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

    प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. पशुमध्ये या रोगांची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज संस्था यांनी सदरची माहिती नजिकच्या पशुवैदयकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार, प्राण्याच्या शर्यती व वाहतूकीवर निर्बंध लागू केले आहेत.

    येथे करा संपर्क

    हा रोग संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता पशुपालकांनी बाह्य किटकांवर नियंत्रण,जैव सुरक्षा, निर्जतुंक द्रावणाच्या कीटक व नाशकांची परिसरात फवारणी इत्यादी आवश्यक या बाबीची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. लंम्पी त्वचा रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा टोल फ्री क्र. 18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.

  • लंपीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील जनावरे बाजार बंद , मंत्री विखे पाटील यांची माहिती

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान गुजरात राज्यात धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातही लंपी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आहे. राज्यातील या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    याबाबत माहिती देताना विखे पाटील म्हणाले, राज्यात लम्पी स्कीन या आजाराचा शिरकाव हा गुजरात आणि राजस्थान या राज्यातून झाला आहे. या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी लसीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे विखे पाटील म्हणाले. सद्यस्थितीत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात लम्पी आजाराने ३२ तर जळगाव जिल्ह्यात १२ जनावरांचा मृत्यू झाला आहे,

    जळगाव जिल्ह्यात त्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून न राहता थेट शेतकऱ्यांच्या दारात जावे आणि औषधोपचार व इतर मदत करावी, अशी कानउघडणी त्यांनी यावेळी केली. जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीजची लक्षणे आढळून येताच जनावरांना शासकीय पशुचिकित्सालयात आणावे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पशु चिकित्सालयात आवश्यक पशु औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, असे विखे पाटील यांनी सांगितले.

  • देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 15 राज्यांतील 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 75 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिक दुग्ध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील 17 जिल्हे प्रादुर्भावग्रस्त आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत

    लम्पीची लागण होताच गायींची दूध देण्याची क्षमता कमी होत आहे. तर काही ठिकाणी पूर्णपणे दुधाचा पुरवठा बंद होत आहे. राजस्थानातील सर्वाधिक लम्पी बाधित पाच जिल्ह्यांमध्ये दुधाचे उत्पादन 30 टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर गुजरातमधील दूध उत्पादनावर 10 टक्के परिणाम झाला आहे. तर पंजाबमध्ये दुधाचे उत्पादन 7 टक्क्यांनी घटले आहे. दरम्यान, पुरवठा कमी झाल्यानं दूध संघांनी दुधाच्या दरात दोन ते चार रुपयांची वाढ केली आहे.

    मिळालेल्या आकडेवारीनुसार, राजस्थानमधील 33 जिल्ह्यांमध्ये लम्पी आजाराचा प्रसार झाला आहे. तर गुजरातच्या 33 पैकी 26 जिल्ह्यांमध्ये या संसर्गाने कहर केला आहे. तर पंजाबमधील 23 जिल्हे आणि हरियाणातील सर्व 22 आणि उत्तर प्रदेशातील 21 जिल्हे याच्या विळख्यात आले आहेत. लम्पी आजारामुळं गाई पालनातून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आलं आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे दुधाचीही टंचाई निर्माण होत आहे.

    बाधित राज्यांची सरकारे पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. कारण हा संसर्ग पसरण्याचे कारण केवळ पावसामुळेच असल्याचे सांगितले जात आहे. पाऊस संपल्याने डास कमी होतील आणि लम्पीचा कहरही कमी होईल असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर लसीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. गायींना या आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण केलं जात आहे.

  • लंपीचा प्रादुर्भाव ! कराड शेती उत्त्पन्न बाजार समितीतील जनावरांचा बाजार बंद




    लंपीचा प्रादुर्भाव ! कराड शेती उत्त्पन्न बाजार समितीतील जनावरांचा बाजार बंद | Hello Krushi









































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विविध भागांमध्ये लंपी या जनावरांना होणाऱ्या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

    दरम्यान, शेती उत्पन्न बाजार समिती कराड, जिल्हा सातारा यांच्या वतीने देखील एक आवाहन जारी करण्यात आलं असून या आवाहनाद्वारे जनावरांचा बाजार बंद करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

    शेती उत्पन्न बाजार समिती कराड येथील बैल बाजार दर गुरुवारी भरत असतो. माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हा सातारा यांनी दिनांक 17 जून 2022 अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांवर लंपी स्कीन या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी मौजे वाघेरे या संसर्ग केंद्रापासून 10 त्रिज्येच्या परिसरातील सर्व गाव बाधित क्षेत्र आणि निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्याला अनुसरून आपत्ती व्यवस्थापन किंवा तहसीलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरीय लंपी स्किन रोग सनियंत्रण समिती तालुका कराड यांच्या आदेशानुसार मौजे वाघेरी या संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर परिसरात जनावरांची खरेदी किंवा विक्री किंवा वाहतूक किंवा बाजार किंवा जत्रा आणि प्रदर्शन आयोजित करण्यास कराड येथील जनावरांचा बाजार लंपी प्रादुर्भावामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

    error: Content is protected !!





  • लम्पीची दहशत ! प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    हॅलो कृषी ऑनलाईन : परराज्यात दहशत माजविणाऱ्या लम्पी या रोजगाची महाराष्ट्रात देखील प्रकरणे वाढली आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील पशुधनाला या रोगाची लागण झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये दिसून येत आहे. म्हणूनच खबरदारी म्हणून बीड आणि अहदनगरच्या जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनं सतर्क झाले असून . जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरुर कासार आणि पाटोदा या तालुक्यातील जनावरांचे बाजार पुढचे काही काळ बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. बीड जिल्ह्यातल्या धसवाडी येथे काही जनावरांमध्ये लंपी स्कीन आजार आढळून आल्याने जिल्हाभरातील इतर जनावरांना त्याची लागण होऊ नये म्हणून अंबाजोगाई, परळी, आष्टी आणि शिरुर तालुक्यासह पाटोदा येथील जनावरांचे बाजार भरवण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. यापूर्वी देखील या आजाराचा संसर्ग अनेक जनावरांना झाला होता. त्यामुळं हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याधिकाऱ्यांनी देखील जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    अंबाजोगाई तालुक्यातल्या धसवाडीमध्ये काही जनावरांना या लम्पी आजाराची लागण झाली असून, गायी आणि बैलांमध्ये या आजाराचा संक्रमण जास्त प्रमाणात होत आहे. या आजारामुळं जनावरांना तीव्र ताप येतो तर तहान भूक आणि रवंत करण्याची क्षमता देखील कमी होते. जनावरांमध्ये अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असा आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

     

  • पुणे जिल्ह्यानंतर ‘या’ जिल्ह्यातील 109 जनावरांना ‘लंपी’ ची लागण

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान, गुजरात राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या लंपी या जनावरांतील त्वचा रोगाने राज्यात सुद्धा हात पाय पसरायला सुरुवाट केली आहे. सुरवातीला पुण्यातील जुन्नर येथील पशुधनाला या रोगाची बाधा झाली होती. आता अकोला जिल्ह्यात देखील या रोगाने शिरकाव केला आहे.

    अकोल्यातील मौजे निपाणा (ता. अकोला), तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यात जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १०९ जनावरांना या आजाराची लागण झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून, त्वचेचे खरड व रक्त नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

    दरम्यान, निपाणा येथील एका जनावरामध्ये ‘लम्पी’ या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे अहवाल तपासणीनंतर सकारात्मक आला आहे. या रोगाचा प्रसार अन्य जनावरांमध्ये जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार संसर्गकेंद्रापासून १० किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

    आजाराची माहिती देण्यासाठी टोल फ्री नंबर जारी

    या रोगाचा फैलाव वाढल्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज झाली असून पशुपालकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आजारासंबंधी माहिती देण्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला आहे. यावर पशुपालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.