Category: NCP

  • अतिवृष्टिबाधितांना रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी

    हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी

    अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके नष्ट झाल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्तांच्या योजना मंजूर कराव्या, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, विजय गव्हाणे, परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, प्रसाद बुधवंत आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. त्यात शेतकऱ्यांचे कर्ज वसुल करू नये., शेती, उद्योगाचे वीज बिल माफ करावे, वीज कनेक्शन तोडून नयेत, रोजगार हमीची कामाकरिता सवलत विद्यार्थ्यांची फी माफ करणे, महसूल माफ करणे, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी उपाययोजना कराव्यात.

    शेती पिकांचे पंचनामे करण्याचा सोपस्कार न करता जिरायती पिकास सरसकट १० हजार रुपये प्रती एकरी तर फळपीकास २५ हजार रुपये प्रति एकरी मदत शासनाने मंजूर करावी. पीक कापणी प्रयोगाची अट न ठेवता पीकविमा योजनेचा लाभ विशेष बाब म्हणून मंजूर करावा. पीकविमा तत्काळ द्यावा, विहित केलेल्या तारखेनंतर महसूल विभागाचे तलाठी यांनी पीकपेरा नोंद करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

     आंचल गोयल यांनी केली ई-पिक पाहणी

    जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या पिकांची १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ई-पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदी घेण्यासाठी सेलू आणि जिंतूर तालुक्यातील गावातील शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक द्वारे कामकाजाची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या सर्वांची ई-पिक पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना ई-पिक पाहणी करण्यास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी केले.

     

  • शरद पवार कृषीमंत्री असताना एका कॉलवर कांदा निर्यात खुली व्हायची, आता आपल्याला कोणी वाली नाही : अजित पवार

    हॅलो कृषी ऑनलाईन : शरद पवार ज्यावेळी देशाचे कृषीमंत्री होते, त्यावेळी एक कॉल केली की लगेच कांदा निर्यात खुली व्हायची. आता मात्र, आपल्याला कोणी वाली नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाहीत, आपण खाणार काय? असा खडा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार हे दौंड तालुक्यातील पारगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

    सध्या दुधाला चांगला दर मिळत आहे. पण निर्मळ दूध द्या. कोणतीही भेसळ करु नका असे आवाहन देखील अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केलं. आपण अंबालिका कारखान्याची कॅपेसिटी वाढवली आहे. त्यामुळं जिथे ऊस लावायचा आहे तिथे लावा. जिथे कांडे लावायची आहे तिथे लावा. जो कारखाना चांगला भाव देईल आणि ज्याचा काटा चांगला असेल त्याला ऊस द्या असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

    सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत आला होता. तो आम्ही ताब्यात घेतला. त्यावेळी साहेब आम्हाला म्हणाले की, कशाला घेतला. आता तोच कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये असल्याचे अजित पवार म्हणाले. दौंड तालुक्यात 700 मतांनी आमचा उमेदवार पाडला. तुम्ही मला ताकद दिली की मला काम करायला हुरूप येतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

    अजित पवार म्हणाले, शेतकरी कधी संपावर जात नाहीत. त्याच्या पोटाला पिळ बसला तर अडचणी येतो. याचा विचार सरकारने करावा, असे पवार म्हणाले. नवीन सरकार आल्यापासून राज्यात रोज तीन ते चार शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाऊस पडून देखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी या सरकारला वेळ नाही. ते केंद्राकडे बघतात असेही पवार म्हणाले. दौंडमध्ये ऊस जास्त आहे. भीमा पाट्स कारखाना सुरुवातीला चांगला चालला, आता तर 2 वर्ष झालं बंदच आहे. यावेळी बोलताना एकाने टाळ्या वाजवल्या, यावेळी टाळ्या काय वाजवतो कपाळ माझं असं अजित पवार म्हणाले. 21 वर्ष झालं राहुल कुल यांच्या हातात साखर कारखाना आहे. राहुल कुलला विचारा अनेकदा मी त्याला मदत केली आहे. जिल्हा बँकेने 38 कोटींची सवलत दिली आहे. ही सवलत दुसरी कोणी दिली नसती असेही अजित पवार म्हणाले.

    संदर्भ : एबीपी माझा

     

  • उसाच्या 265 बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

    हॅलो कृषी ऑनलाईन : हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. मागच्या दोन वर्षात तर राज्यात ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी अशा ठिकाणी देखील उसाचे उत्पादन घेतले गेले जिथे परंपरागत उसाची शेती केली गेली नाही. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेचे देखील चांगले उत्पादन राज्यामध्ये झाले आहे. असे असताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उसाबाबत एक महत्वाचा सल्ला दिला आहे. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये बोलत होते.

    यावेळी बोलताना पवार यांनी म्हंटले की, सध्या रानं ओली आहेत, वापसा नाही. त्यामुळे आत्ता लगेच उसाची तोडणी झाली तर रिकव्हरी चांगली होणार नाही. रिकव्हरी चांगली आली तरच उतारा चांगला पडतो, साखर जास्त निघते. साखर जास्त निघाली, तर भाव चांगला मिळतो. एका टन ऊसातून किती साखर निघते यावर ते अवलंबून असतं. काही ठिकाणी १० टक्के, ११ टक्के, १२ टक्के निघते. कोल्हापुरात तर टनामागे ११४ किलो साखर निघते. म्हणजे १४ टक्के साखर निघते. एवढा विरोधाभास आहे.”

     २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका

    पुढे बोलताना त्यांनी उसाच्या बेण्याबद्दल सांगितले ते म्हणाले “एका टनातून किती साखर निघणार हे जमिनीच्या पोतावर, उसाचं बेणं कोणतं आहे यावर अवलंबून असतं. माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या बेण्याच्या नादाला लागू नका. तुमचा ऊस वेळेवर जायचा असेल, भाव चांगला मिळवायचा असेल तर ८६-०-३२ , ८०-०५, १०-००१, १२-१२-१ ही उसाची बेणी वापरा,” असा सल्ला अजित पवारांनी दिली.

    “आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्ट्युट ही संस्था चालवतो. तिथं नवीन उसाचं बेणं तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कमी पाण्यात त्या उसाला दशी न पडता उसाचं टनेज जास्त येईल यावर संशोधन करत आहेत. त्यातून काही वाणांचा शोध लगाला.”

    संदर्भ -लोकसत्ता

  • ‘गोधन खतरे मे है’ सांगणारे, गोधन सांकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत : पवारांची टीका

    हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यांमध्ये लंपीचा कहर वाढत असल्यामुळे एकीकडे पशुपालक हे चिंतित असताना लंपीवरून आता राजकारण ही तापायला सुरुवात झाली आहे. :राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे है’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याशिवाय केंद्रीय माध्यमांवर ही त्यांनी टीका करीत म्हंटले आहे की, “राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर राष्ट्रीय मीडियानेही लम्पीकडं लक्ष केंद्रित करायला हरकत नाही”.

    लंपी बाबत केंद्र सरकरच्या कारभारावर टीका करणारी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ” देशात ८२ हजार जनावरं लंम्पी आजाराने दगावली तर लाखो जनावरं लंम्पीग्रस्त असल्याने पशुधनावर आणि पर्यायाने बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलंय. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याने काही अंशी दिलासा नक्कीच मिळत आहे.

    अतिरिक्त मदत मिळणं गरजेचं

    मृत पावलेल्या पशुधनास NDRF निकषात असलेल्या मदतीप्रमाणे राज्यसरकार स्वतःच्या तिजोरीतून ३० हजार रुपयांची मदत देत आहे. परंतु सात वर्षे जुने NDRF निकष आणि दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किंमती बघता ही मदत पुरेशी नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं अतिरिक्त मदत मिळणं गरजेचं आहे.
    केंद्र सरकारने लम्पी आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित केल्यास SDRF मधील ‘आपत्ती निवारण आणि पुनर्वसन’ या सेक्शन अंतर्गत मदत देता येऊ शकते. असं झाल्यास शेतकऱ्यांना राज्य शासनाची ३० हजार आणि SDRF ची ३० हजार अशी एकूण ६० हजार रुपये पर्यंत मदत मिळू शकते. राज्यशासनाने या संदर्भात केंद्राकडे त्वरित पाठपुरावा करायला हवा.

    राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर राष्ट्रीय मीडियानेही लम्पीकडं लक्ष केंद्रित करायला हरकत नाही”. अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी केंद्र सरकारची कानउघाडणी केली आहे.