Category: Shambhuraj desai

  • केंद्र शासनांच्या प्रमुख योजनांचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा

    पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात केंद्र शासनाच्या विविध प्रमुख योजनांचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजनाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना देवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही बैठकीत दिले.

    या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    देसाई म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण चे उद्दिष्ट शासनाकडून प्राप्त झाले आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. ज्या लाभार्थ्यांकडे घर बांधण्यासाठी जागा नाही अशांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नगर पालिकांचे मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी यांना उद्दिष्ट द्या व वेळावेळी या योजनेचा आढावा घ्यावा.

    जल जीवन मिशन अंर्तत ग्रामीण पाणी पुरवठ्याची मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करावा. आयुष्मान भारत योजनेंर्गत ई-कार्ड दिले जाते. शासनाने ठरवून दिलेल्या शस्त्रक्रिया या योजनेंतर्गत मोफत करण्यात येते. याचा गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शिबीरांचे आयोजन करुन ई-कार्डचे वाटप करावे. यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करावी. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ई-केवायसी करुन घ्यावे.

    बेठकीत श्री. देसाई यांनी किसान क्रेडीट कार्ड, अटल पेन्शन योजना, स्वनिधी, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, स्वामित्व कार्ड, भारत नेट व स्वामित्व योजना ड्रोनद्वारे गावांचे सर्व्हेक्षण या योजनांचा आढावा घेवून योजना विषयीचे जे प्रश्न जिल्हास्तरावर आहे ते तात्काळ सोडविले जातील. ज्या कामांना मंत्रालयस्तरावर मंजूरी पाहिजे असेल तर अशा कामांचे प्रस्तावही द्यावेत त्यालाही मंजूरी आणली जाईल, असेही त्यांनी बैठकीत सांगितले

  • सातारा जिल्ह्यात लंम्पीचा प्रादुर्भाव; तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या मंत्री देसाईंच्या सूचना

    हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सातारा

    लंम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची सद्यस्थितीचा आढावा श्री. देसाई यांनी मंत्रालय, मुंबई येथून दूरदृश्यप्रणाली द्वारे घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (दूरदृश्यप्रणाली द्वारे), सातारा जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    देसाई म्हणाले, लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे. ज्या गावांमधील पशुधनास लंम्पी आजारची लागण झाल्याचे समजतात तात्काळ भेट देवून पशुधनास उपचार करावे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने सज्ज रहावे. लंम्पी आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाईल. जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास लंम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून औषधोपचार करावेत, असेही आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यात लंम्पी चर्म रोगाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

    जिल्ह्यात 46 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून त्यापैकी 17 हजार 241 लसमात्रांचा वापर करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले. 26 हजार 659 लसमात्रा शिल्लक असून त्याद्वारे लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. तसेच पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे 2 लाख लसमात्रांची मागणी करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी बैठकीत सांगितले.