हॅलो कृषी ऑनलाईन : कमी वेळात चांगले उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीन (Soybean) या पिकाची लागवड करतात. त्यात मागच्या दोन तीन वर्षांपासून सोयाबीनला बाजारात चांगली किंमत मिळवू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल सोयाबीन लागवडीकडे आहे. यंदाच्या वर्षी देखील राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र अनेक भागात पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वर रोग आणि किडींचा हल्ला झाला आहे. तर काही ठिकाणी शेंगाचा भरल्या नाहीत. असे असताना परभणी मधील एका शेतकऱ्याच्या शेतात एका रोपाला तब्बल ४१७ शेंगा लागल्या आहेत.

होय …! आम्ही बोलत आहोत परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या मुक्काम खोरस येथील शेतकरी गणेश रामराव दाढे (३२) या शेतकऱ्याबद्दल… खरे तर या भागात सर्रासपणे कपाशीचे पीक घेतले जाते. पण कपाशीच्या पिकाला खर्च येत असल्यामुळे यंदा दाढे यांनी सोयाबीन (Soybean) लागवड करायची ठरवली. पण ते एवढं सोपं नव्हतं. कारण या निर्णयाला घरच्या मंडळींसहित गावातील मित्रपरिवाराचाही विरोध होता. मात्र या सगळ्यांचा सल्ला झुगारत दाढे यांनी सोयाबीनचा घ्यायचे ठरवले. सुरवातीला लोक त्यांच्यावर हसत होते. मात्र त्यांच्या कष्टाचे चीज झाले असून त्यांच्या सोयाबीन पिकाला चांगल्या शेंगा आल्या आहेत.

दाढे यांनी सोयाबीनचे (Soybean) वाण KDS 726 याची लागवड केली. २५ एकरमध्ये लागवडीसाठी त्यांना १८ बॅगा बियाणे लागले. विशेष म्हणजे या वाणाची बॅग 22 किलोची असते. इतर बॅगा 30 किलोच्या असतात. पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यानंतर त्यांना एकरी 15 क्विंटल प्रमाणे विक्रमी 300 क्विंटल पेक्षा जास्त सोयाबीन होण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनला अतिवृष्टीचा मोठा धोका असतो. पण योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पीक चांगले आले असून चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळेल अशी आशा गणेश रामराव दाढे यांना आहे.