केंद्र सरकारने लंपी त्वचा रोगाला महामारी घोषित करावे, सीएम गेहलोत यांचे मोदींना पत्र

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांना गायींमध्ये पसरणाऱ्या लंपी त्वचेच्या आजाराला महामारी म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, महामारी घोषित केल्याने या रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि पशुधन वाचवण्यासाठी वैद्यकीय आणि वाहतूक यासारख्या सुविधा मजबूत करण्यात मदत होईल.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजस्थान व्यतिरिक्त 13 राज्यांमध्ये हा आजार पसरला आहे. मात्र, या आजाराचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे.राजस्थान सरकार हा आजार रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संदर्भात आवश्यकतेनुसार जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय पशू वाहतूक, गुरांचा हाट, पशु मेळा यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय राज्यासाठी पुरेशा लसी मिळण्याची मागणी केली.

दरम्यान राजस्थान राज्यात 16.22 लाख लसी उपलब्ध आहेत, त्यापैकी 12.32 लाख गोवंशीय प्राण्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच 11.59 लाख जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. रोगग्रस्त भागात रोग सर्वेक्षण, रोग निदान व उपचारासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त वाहने भाड्याने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *