हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी केळीला चांगला भाव मिळाला आहे. शिवाय सणासुदीमुळे केळीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. असे असताना एका शेतकऱ्याला आपल्या तब्बल ५ एकर केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवण्याची नामुष्की आली आहे. होय…! नंदुरबार जिल्ह्यतील शहादा तालुक्यात केळी पिकावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर कष्टाने जोपासलेल्या केळीच्या बागा नष्ट करण्याची वेळ आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. मात्र यंदा बदलत्या हवामानामुळे केळी बागांवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव शेतात जनावरे सोडली आहेत. तर काहींना आपल्या बागा उपटून टाकाव्या लागत आहेत. खेडदिगर परिसरात याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.
दरम्यान खेडदिगर येथील शेतकरी सुनिल पाटील यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावरील केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवला आहे. त्यांनी केळीच्या बागेसाठी आतापर्यंत केलेला साडेपाच लाखांचा खर्च वाया गेल्यानं ते कर्जबाजारी झाले आहेत. शासनानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.