हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने (Crop Management) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
१) कापूस :
—पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
–कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या (Crop Management) व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
— कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
–कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.
— कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.
२) सोयाबीन
–पाऊस झालेल्या ठिकाणी काढणी न केलेल्या सोयाबीन पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
–पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे.
–काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.
–काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी.
–पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करावयाचा (Crop Management) असल्यास सोयाबीनची मळणी 350 ते 400 आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल.
–मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल.