हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी
अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके नष्ट झाल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्तांच्या योजना मंजूर कराव्या, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, विजय गव्हाणे, परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, प्रसाद बुधवंत आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. त्यात शेतकऱ्यांचे कर्ज वसुल करू नये., शेती, उद्योगाचे वीज बिल माफ करावे, वीज कनेक्शन तोडून नयेत, रोजगार हमीची कामाकरिता सवलत विद्यार्थ्यांची फी माफ करणे, महसूल माफ करणे, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी उपाययोजना कराव्यात.
शेती पिकांचे पंचनामे करण्याचा सोपस्कार न करता जिरायती पिकास सरसकट १० हजार रुपये प्रती एकरी तर फळपीकास २५ हजार रुपये प्रति एकरी मदत शासनाने मंजूर करावी. पीक कापणी प्रयोगाची अट न ठेवता पीकविमा योजनेचा लाभ विशेष बाब म्हणून मंजूर करावा. पीकविमा तत्काळ द्यावा, विहित केलेल्या तारखेनंतर महसूल विभागाचे तलाठी यांनी पीकपेरा नोंद करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
आंचल गोयल यांनी केली ई-पिक पाहणी
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या पिकांची १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ई-पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदी घेण्यासाठी सेलू आणि जिंतूर तालुक्यातील गावातील शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक द्वारे कामकाजाची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्या सर्वांची ई-पिक पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना ई-पिक पाहणी करण्यास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी केले.