हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
1)सोयाबीन : उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80 मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारावे.
२)खरीप ज्वारी : पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा मॅलाथिऑन 5% भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे धुरळणी करावी किंवा मॅलाथिऑन 50% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
३)ऊस : पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
४)हळद : हळदीच्या पानावरील ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
५) हरभरा : हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास कोरडे व थंड हवामान मानवते.
६) करडई : करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा आणि ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन काढणीनंतर करडई पीक घ्यावे.