‘लंम्पी’ला घाबरू नका, दवाखान्याशी संपर्क करा; पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा

लंम्पी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जनावरांना आवश्यकेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असून वेळीच उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो. पशुपालकांनी घाबरुन न जाता नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार, व जिल्हा परिषद सातारचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

रोग किटकांपासून पसरणारा लंम्पी त्वचारोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. सातारा जिल्हात फलटण तालुक्यातील खामगांव, जिंती, फडतरवाडी, चव्हाणवाडी व सातारा तालुक्यातील महागांव, कोडोली (पांढरवाडी ), खटाव तालुक्यात अनपटवाडी व मानेवस्ती कराड तालुक्यात वाघेरी अशी नऊ गावास लागण झाली आहे. एकूण 45 गाय व 10 बैल, अश्या 55 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. पशुमध्ये या रोगांची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज संस्था यांनी सदरची माहिती नजिकच्या पशुवैदयकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार, प्राण्याच्या शर्यती व वाहतूकीवर निर्बंध लागू केले आहेत.

येथे करा संपर्क

हा रोग संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता पशुपालकांनी बाह्य किटकांवर नियंत्रण,जैव सुरक्षा, निर्जतुंक द्रावणाच्या कीटक व नाशकांची परिसरात फवारणी इत्यादी आवश्यक या बाबीची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. लंम्पी त्वचा रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा टोल फ्री क्र. 18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *