हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्यासद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आजच्या लेखात आपण द्राक्ष घड कुजण्याच्या समस्येविषयी जाणून घेऊया…
द्राक्ष घड कुजण्याची समस्या
कधी होते कुजेची समस्या ?
दोन ते तीन आठवड्यांपूर्वी फळछाटणी केलेल्या बागेत या वेळी काडीवर काडीवर निघालेल्या फुटींची संख्या जास्त असेल, तसेच फुटींची वाढही जास्त झालेली असेल. एका काडीवर साधारणतः चार ते पाच डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग केले जाते. या वेळी साधारणतः सात ते आठ पानांची अवस्था असेल. म्हणजेच प्रत्येक काडीवर ३५ ते ४० पाने असतील. वेलीवर असलेल्या काड्याची संख्या लक्षात घेता या वेळी प्री ब्लूम अवस्थेमध्ये दाट कॅनॉपी तयार झालेली आहे. कोरडे वातावरण असल्यास घडावर फारसे विपरीत परिणाम होणार नाहीत. मात्र सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे वाढलेल्या आर्द्रतेमुळे एकतर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढतो. किंवा कुजेची समस्या निर्माण होते.
काय करावे उपाय ?
१) प्री ब्लूम अवस्थेमध्ये घडात अजून देठ तयार झालेले नसले तरी घडावर पाणी साचून राहिल्यास तो घड कुजण्याची शक्यता वाढते. यासाठी वेळीच फेलफूट काढणे गरजेचे होते. या हंगामात सतत होत असलेल्या पावसाचा विचार करता काडीवर फेलफुटी शक्य तितक्या लवकर काढून घ्याव्यात.
२)दरवर्षीच्या तुलनेत फुटींची संख्या कमी ठेवावी. कॅनॉपीमध्ये आर्द्रता कमी करण्याच्या दृष्टीने हे करणे अत्यंत गरजेचे असेल.
३) ज्या बागेत वाफसा परिस्थिती अजून आलेली नाही, अशा भागात काही काळ पाऊस सुरू असल्यास डाऊनी मिल्ड्यू, करपा किंवा जिवाणूजन्य करपा यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल. फळछाटणीनंतर १४ ते १७ दिवसांच्या कालावधीत फेलफुटी काढण्याला प्राधान्य द्यावे.
४)सतत झालेल्या पावसामुळे बोदामधून पाणी व त्यासोबत उपलब्ध अन्नद्रव्येही वाहून गेली असतील. अशा स्थितीमध्ये द्राक्ष वेल अशक्त होऊ शकते. वेलीला ताण बसतो. यामुळे कुजेची समस्याही वाढताना दिसते. यावर मात करण्यासाठी वेलीला सशक्त करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. झिंक, बोरॉन ची फवारणी प्रत्येकी अर्धा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घ्यावी. पालाश दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे एक ते दोन फवारण्या करून घ्याव्यात.
५)पाने पिवळी असलेल्या परिस्थिती वाढीचा जोम कमी असल्यास नत्रयुक्त किंवा नत्र स्फुरदयुक्त खतांची फवारणी करता येईल.
फेलफुटी काढताना कोवळ्या काडीवर जखमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस सुरू असलेल्या परिस्थितीत या जखमेमुळे कुजेची किंवा रोगाची समस्या येण्याची शक्यता असेल. तेव्हा फेलफूट काढल्यानंतर लगेच बुरशीनाशकांची फवारणी करून घ्यावी.