हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीये. एकीकडे राज्य सरकार आत्महत्यामुक्त शेतकरी चे नारे देत असताना प्रत्यक्षात शेतीमालाला नसलेला भाव आणि कर्जबाजारेपणामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतोय. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मोदींना शुभेच्छा देत आत्महत्या
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावामध्ये राहणारे शेतकरी दशरथ लक्ष्मण केदारी या अल्पभूधारक शेतकऱ्याने शनिवारी कर्जबाजारीपणा व शेतमालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेततळ्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवले होती. त्यानुसार फायनान्स वाले दमदाठी करतात व पदसंस्था वाले अपशब्द वापरतात त्यात शेतमालाला रास्त बाजारभाव मिळत नाही याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. मोदींचा शेतीवर कंट्रोल नाही त्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे असं त्यांनी चिठ्ठी मध्ये म्हंटले आहे. शेवटी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कांद्याला भाव नाही …
दशरथ यांच्या मालकीची एक एकर शेती आणि एक दुचाकी होती. या दोन्हीसाठी त्यांनी अडीच लाखांचे कर्ज काढले होते. या कर्जाच्या पैशातून मे महिन्यात त्यांच्या हाती कांद्याचं पीक आले. पण तेव्हा कांद्याचा दर 10 रुपये होता. म्हणून त्यांनी कांदा न विकता त्याची साठवणूक केली. त्यासाठी देखील त्यांनी खर्च केला. पण कांद्याचा भाव काही वाढला नाही आणि पावसामध्ये त्यातील अर्धा कांदा खराब झाला.
असे असताना सुद्धा दशरथ यांनी खचून न जाता पुन्हा आपल्या शेतात टोमॅटो आणि सोयाबीनचे पीक घेतले. पण पहिल्या पावसात टोमॅटो खराब झाला. तर मागच्या आठवड्यात झालेल्या पावसात सोयाबीनचे पीक देखील खराब झाले. सोयाबीन पिकांचा पंचनामा करावा यासाठी दशरथ 17 सप्टेंबरला तलाठी कार्यालयात गेले. दोन तास तिथे बसून पंचनाम्याची मागणी त्यांनी केली. पण काहीच यश आले नाही त्यानंतर चिंतेत आलेल्या दशरथ यांनी दुपारच्या सुमारास शेतात जाऊन आधी विष प्राशन केल. त्यानंतर त्यांनी शेत तळ्यात उडी घेत आत्महत्या केली.
या घटनेची नोंद आळेफाटा येथील पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. आळेफाटा येथे शरविच्छेदन करून रात्री बनकर फाटा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.