हॅलो कृषी ऑनलाईन : लहरी हवामान, किडी आणि रोगांचे पिकांवर आक्रमण यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. यंदाच्या खरिपात काही हाती लागते की नाही अशी अवस्था असताना आता खतांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी रशिया -युक्रेन युद्धामुळे खतांच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली होती. आता पुढील वर्षात देखील खतांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
म्हणून खतांच्या किमती वाढणार
नैसर्गिक वायूंच्या वाढत्या किमतीमुळे जर्मनीच्या बीएएसएफ कंपनीने अमोनिया उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षात खतांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. बीएएसएफ ही जर्मनीमधील कंपनी जगातील सर्वात मोठ्या खत उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेत अमोनिया उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. बीएएसएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, “अमोनिया उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूची आवश्यकता भासते. पण नैसर्गिक वायूंच्या वाढत्या किमतीमुळे अमोनिया उत्पादन खर्चिक झाले आहे. त्यामुळे कंपनीने या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.”
नैसर्गीक वायूंच्या वाढत्या किमतीमुळे खत उत्पादन महाग होत आहे. त्याचा भार शेतकऱ्यांवर पडणार आहे. पुढच्या वर्षी खतांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, युरोपमध्ये अनेक ठिकाणी खतांचे प्लांटस आहेत. तिथं अमोनिया उत्पादनासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत नैसर्गिक वायूसाठी केलेल्या खर्चात ८० लाख युरोपियन पौंड्सची वाढ झाली आहे.
इतर पर्यायांवर विचार
तसेच जर शक्य असेल तर नैसर्गिक वायूला पर्याय म्हणून इतर ऊर्जा स्त्रोत जसं की इंधन तेलाचा वापर करता येईल का यावरही विचार चालू आहे. दरम्यान पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी इतर पुरवठादारांकडून अमोनियाची खरेदी करता येते का यावरही कंपनी लक्ष ठेवून आहे. नैसर्गिक वायूच्या तुटवड्यामुळे जर्मन सरकारने आणीबाणी जाहीर केली तरी बीएएसएफ कंपनीच्या लुडविगशाफेन या प्लांटवर उत्पादन सुरूच राहील असेही कंपनीच्या वतीने या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीचा परिणाम पुरवठ्यावर होऊ नये म्हणून इतर ही उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे. जर्मन सरकारने तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातल्या आणीबाणीची घोषणा केली तर बीएसएफ च्या लुडविगशाफेन साइटवर उत्पादन सुरूच राहील, अशी माहिती बीएएसएफचे प्रमुख मार्टिन ब्रुडरमुलर यांनी दिली.
रशियाच्या गॅझप्रॉमने जाहीर केल्यानुसार, जर्मनी आणि इतर मध्य युरोपियन देशांना नॉड स्ट्रिम पाईपलाईनद्वारे जो गॅस पुरवला जातो त्यात रशिया वीस टक्क्यांची घट करणार आहे. जर्मनी रशियाकडून अंदाजे ५५ % नैसर्गिक वायूंची आयात करतो. यातला बहुतांश गॅस नॉडस्ट्रिम वन पाईपलाईनद्वारे पुरवला जातो. यारा इंटरनॅशनल या बहुराष्ट्रीय कंपनीनेही खत उत्पादनात कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.