हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार परतीचा पाऊस सुरु असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. @CMOMaharashtra pic.twitter.com/BsjqkGJWTY
— Raj Thackeray (@RajThackeray) October 20, 2022
काय आहे पत्रात ?
ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि शेतकरी बांधवाना दिलासा द्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
पंचनामे नीट होतील हे पहावं
सरकारने पंचनामाचे आदेश दिलेले आहेत पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनामाचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्ध पातळीवर आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाने साजरी होऊ द्या
दिवाळी हा आनंदाचा सण म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकट काळानंतर शेतकरी ही दिवाळी धुमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार अशावेळी त्यांना दिलासा देऊन त्यांची ही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावे अशी ही नम्र विनंती.
अशा आशयाचा पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिला आहे.