हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे मका भाव पाहता हे भाव चांगले असल्याचे दिसून येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे मक्याच्या दरात तेजी असल्याचे सांगण्यात येत आहे. मक्याला चांगला दर मिळत असल्यानं खरिपातील मका लागवडही काही प्रमाणात वाढली आहे.
लष्करी आळीचा फटका
यंदा कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, हमाचल प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये मका लागवड वाढली आहे. मात्र मका पिकाला पाऊस आणि लष्करी अळीचा फटका बसतोय. सध्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आहवाल आहेत. लष्करी अळीनं मका, बेबी काॅर्न, मधु मका आणि मक्याच्या धांडांवरही आक्रमण सुरु केलंय.
सध्या नुकसानीची पातळी तुलनेत कमी आहे. मात्र लष्करी अळीचं वेळीच नियंत्रण केलं नाही तर नुकसानीचं प्रमाण वाढू शकतं. सध्या अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना फवारण्या कराव्या लागत आहेत. यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढतोय. तर उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होतेय.
मक्याची उपलब्धता कमी
देशात दरवर्षी ३०० लाख टनांच्या दरम्यान मक्याचा वापर होतो. तर निर्यातीसाठीही मोठी मागणी असते. मात्र बाजारात मका कमी उपलब्ध असल्यानं देशात सध्या मक्याला २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपये दर मिळतोय. तर आंतरराष्ट्रीय बाजारात ६.७८ डाॅलर प्रतिबुशेल्सने मक्याचे व्यवहार झाले. देशात तर मक्याचा पुरवठा कमी आहेच, शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही कमी मका उपलब्ध आहे. त्यामुळं मक्याचे दर टिकून राहतील. तर देशात मक्याचे दर दिवाळीपर्यंत सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.