भात पिकाच्या सद्यस्थितीत कसे कराल कीड आणि रोगांचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या भात पीक हे पुनर्लागवडीनंतर ३० ते ६० दिवसांच्या कालावधीमध्ये आहे. या काळामध्ये बहुतांश पीक हे फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. या काळामध्ये खोड कीड, तपकिरी तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, सूत्रकृमी, करपा, कडा करपा, पर्णकोष करपा, खोड कुज अशा कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आपल्या पिकामध्ये कीड किंवा रोगाची व्यवस्थित ओळख पटवून पुढील पैकी योग्य ती उपाययोजना करावी.

खोड कीड 

जर एका सापळ्यात ३० ते ३५ पतंग एका आठवड्यात दिसून आल्यास पुढील प्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी. पोटरी अवस्थेत पीक असताना कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर (किंवा १००० ग्रॅम प्रति हेक्टर) किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि प्रति लिटर (किंवा १५० मिलि प्रति हेक्टर) या प्रमाणे फवारणी करावी.

तपकिरी तुडतुडे 

किडीच्या नियंत्रणासाठी अधूनमधून शेतातील पाण्याचा निचरा करवा. १-२ दिवसासाठी शेत कोरडे ठेवावे. परभक्षी कीटकाच्या संवर्धनासाठी बांधावर चवळी, मूग, सोयाबीन, झेंडू किंवा इतर फुलझाडे लावावीत. जर तुडतुड्यांची संख्या प्रति झाड १०-१५ पेक्षा जास्त असल्यास पुढील पैकी एक फवारणी करावी.

(फवारणी प्रमाण- प्रति लिटर पाणी)

क्विनॉलफॉस (२५ % इसी) १.५ मिलि किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा डायनोटेफ्युरॉन (२० एसजी) ०.३ ते ०.४ ग्रॅम किंवा पायमेट्रोझीन (५०% डब्ल्यूजी) ०.६ ग्रॅम किंवा ट्रायफ्लूमेझोपायरीन (१० % एससी) ०.४७ मिलि

टीप ः पीक ४५ ते ६० दिवसांचे असेपर्यंत या कीटकनाशकाची फक्त एकदाच फवारणी करावी.

पाने गुंडाळणारी अळी

फवारणी प्रति लिटर पाणी

कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि.

सूत्रकृमी

पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी कार्बोफ्युरॉन (३ जी) ३३ किलो प्रति हेक्टरी वापरावे.

करपा

ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) ०.६ ग्रॅम किंवा आयसोप्रोथीओलेन १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

1)अणुजीवजन्य करपा/ कडा करपा

शेतात या रोगांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर नत्रयुक्त खते अत्यंत कमी द्यावीत किंवा देऊ नयेत.

2)पर्णकोष करपा

हेक्साकोनॅझोल (५ ईसी) २ मिलि प्रति लिटर प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारावे.

3)खोड कुज

शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. त्यानंतर प्रोपीकोनॅझोल १ मिलि किंवा डायफेनोकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *