सद्यस्थितीतील कापूस पिकातील रोग आणि किडींचे कसे कराल व्यवस्थापन ?

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या हवामानामुळे कापूस पिकावर रोग आणि किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यावर काय उपाय करायचे याबाबतची माहिती आपण आजच्या लेखात घेऊया. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीकडून प्रसारित करण्यात आली आहे.

१) कापूस पिकातील दहिया :

कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

२) रसशोषण करणारी कीड :

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा डायफेन्थुरॉन 50% 240 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

३) गुलाबी बोंडअळी :

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *