हॅलो कृषी ऑनलाईन : सेनगावातील गोरेगाव येथील शेतकरी संपाच्या आठव्या दिवशी शुक्रवारी (ता. २३) अनेक गावांतील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.
सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गोरेगाव व परिसरातील शेतकरी आंदोलने करीत संपावर गेले आहेत. आजच्या ८ व्या दिवशी गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी चौफुली रस्त्यावर कांदे, बटाटे, टमाटे, भाजीपाला फेकून देत शासन विरोधात घोषणा दिल्या.
कनेरगाव – सेनगाव रस्त्यावरील हाताळा आणि सुरजखेडा फाट्यावर शेतकऱ्यांनी टायर जाळून आंदोलन केले. वरखेडा (ता. सेनगाव) येथील शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी दिंडी काढून शासनाचा निषेध केला. आंदोलनात बालाजी महाराज शिंदे वरखेडकर, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, गजानन सावके, राधेश्याम कावरखे, गजानन सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.