‘वारणा’ आणि ‘गोकुळ’ कडून गायीच्या दूध खरेदी दरात वाढ; 1 सप्टेंबर पासून नवे दर लागू

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वारणा आणि गोकुळ दूध समूह यांच्याकडून गायीच्या दूध दरात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वारणा दूध संघाने गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये दर वाढ केल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली आहे. कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाने गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयांनी वाढ केली आहे,’’ अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली.

म्हणून दुधाच्या दरात वाढ

सध्याच्या परिस्थितीत पशुपालकांना पशुखाद्याच्या वाढलेल्या दराचा सामना करावा लागत आहे. याबाबत माहिती देताना डॉ. कोरे यांनी सांगितले की, ‘‘दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना आर्थिक झळ बसू नये म्हणून वारणा दूध संघाने १ सप्टेंबरपासून गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर २ रुपये प्रमाणे वाढविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता ३.५ फॅटला व ८.५ एसएनएफला तो ३२ रुपये झाला आहे.’’

‘‘दूध संघाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. महापूर, अवकाळी पाऊस अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. अल्पदरात पशू वैद्यकीय सेवा, विमा सुरक्षाकवच, व रेडी संगोपन यासारखे अनेक उपक्रम संघामार्फत राबविले जात आहे,’’ अशी माहिती कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली. संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकांउट्स व्यवस्थापक सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, विपणन प्रमुख अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.

तर दुसरीकडे गोकूळचा गाय दूध खरेदी दर ३. ५ फॅट व ८.५ एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर रुपये ३१ रुपये दर राहील, अशी माहिती पाटील यांनी दिली. संघाने गाय दूध खरेदी दरात वाढ चार वेळा करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *