हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी
मागील आठ दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर शेत शिवारात खरीपातील सोयाबीन ,कापुस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन देत शनिवार 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी युवासेनाजिल्हाप्रमुख (शिंदे गट ) दीपक टेंगसे यांच्या मदतीने कॉन्फरन्स कॉल करत उपोषणकर्त्यांची थेट संपर्क साधला.
यावेळी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन मायबाप सरकारने लक्ष देण्याची मागणी केली .प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचे पालकमंत्र्यांच्या कानावर घातले .दरम्यान पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मी शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात बातम्या पाहिल्या , त्यादिवशी पाहिले ,शेतकऱ्यांचे फोन आले असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात माहिती घेतली असुन उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये अतिवृष्टीचा विषय मांडणार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये व ऊन वाऱ्यात उपोषणास न बसता लेकरा बाळांची काळजी घ्यावी. असे आवाहन यावेळी त्यांनी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना केले आहे .
दरम्यान दुसऱ्या दिवशी भर पावसात उपोषण करते उपोषण स्थळी बसून होते . साखळी पद्धतीने या ठिकाणी शेतकरी उपोषणासाठी तालुका भरातून येत असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखवला आहे.
शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पाथरी येथे चालू असलेल्या शेतकरी उपोषणाला रविवारी सायंकाळी उशिरा जिल्हा कृषी अध्यक्ष व्ही डी लोखंडे , प्रभारी तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे , तहसीलदार सुमन मोरे यांच्यासह विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी भेट देत उपोषण मागे घेण्याची मागणी केली परंतु मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला सांगितले आहे . यावेळी उपोषणकर्ते शेतकरी अधिकारी यांच्यात शाब्दीक चकमक झाली .