कृषिमंत्र्यांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडयातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिल्या. तर पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

यावेळी बोलतांना सत्तार म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी मला केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये. पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद तालुक्यातील दुधड, लाडसावंगी,शेकटा, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव, धोपटेश्वर , लालवाडी, जालना तालुक्यातील जामवाडी ,पानशेंद्रा, अंबड तालुक्यातील अंतरवाला, गोलापांगरी, वडीगोद्री, बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाडळसिंगी, जप्ती पारगाव गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *