कात्रज दूध संघ देणार फरकाची रक्कम; 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्हा दूध उत्पादक (कात्रज डेअरी) संघाला २०२१-२२ या आर्थिक वर्षात दोन कोटी ४६ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. या वर्षी संघास दूधपुरवठा केलेल्या उत्पादकांना प्रतिलिटर एक रुपया दरफरकाची रक्कम देण्यात येणार असून, त्यासाठी ८ कोटी ६३ लाख रुपये लागतील, अशी माहिती वार्षिक सभेत देण्यात आली. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली.

संघाच्या अध्यक्षा केशर पवार यांनी संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पवार म्हणाल्या, ‘‘गतवर्षी दूधदर फरकापोटी उत्पादकांना ७.९० कोटी रुपये दिले होते. या वर्षी दूधदर फरकापोटी ८.६३ कोटी देण्यात येणार आहेत. दूध संस्थांनी संघास पुरविलेल्या दुधाची रक्कम मिळण्यास साधारण २० दिवस लागतात, हा कालावधी कमी करण्यात येईल.’’

लंपी लसीकरण

पशुधनाला झालेल्या लम्पी स्कीन रोग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनांची मागणी सभासदांनी केली. त्यावर संघामार्फत लसीकरण चालू असून, येत्या आठवडाभरात लसीकरण पूर्ण होईल. सर्व जनावरांचा सरकारमार्फत विमा उतरविण्याची मागणी सरकारकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या १६ आदर्श दूध संस्थांना सन्मानचिन्ह आणि ११ हजार रुपये देऊन या वेळी गौरविण्यात आले. संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांनी आभार मानले. प्रारंभी प्रभारी व्यवस्थापकीय संचालक संजय कालेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

आदर्श सहकारी दूध उत्पादक संस्थांची नावे :

वनारीनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था (बेंढारवाडी, ता. आंबेगाव)
हुतात्मा राजगुरू (राजगुरुनगर, ता. खेड)
अमृतेश्‍वर (चिखलगाव, ता. खेड),
शिवम (मुखई, ता. शिरूर)
फुलाई (आरणगाव, ता. शिरूर)
पंचवटी (शिंदेवस्ती राक्षेवाडी, ता. शिरूर)
सोमनाथ (केडगाव, ता. दौंड)
श्रीराम (निमगावसावा, ता. जुन्नर)
कुलस्वामी (धामणखेल, ता. जुन्नर)
जखणीमाता (अंत्रोली, ता. वेल्हा)
कानिफनाथ (वडकी, ता. हवेली)
महादेव (कोंढावळे, ता. मुळशी)
उरवडे आंबेगाव (उरवडे, ता. मुळशी)
जय मल्हार (नानोली, ता. मावळ)
गणेश (रानमळा, धालेवाडी)
मळाईदेवी(पांगारी, ता. भोर).

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *