हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी (Lumpy) त्वचा रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासन स्तरावर देखील प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान लंपी मुळे पशुधन दगावल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
किती मिळणार मदत ?
राष्ट्रीय आपत्ती धोरणानुसार राज्य शासनाच्या १०० टक्के अर्थसहाय्यातून (Lumpy) ही मदत दिली जाईल. या साठीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दूधाळ पशुधनासाठी ३० हजार, ओढकाम करणाऱ्या पशुधासाठी (बैल) २५ हजार, तर वासरांना १६ हजार रुपये मदत मिळेल. ही मर्यादा अनुक्रमे तीन, तर वासरांसाठी ६ ठेवण्यात आली आहे.
मदत देण्यासाठी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा पशुचिकित्सालयांचे प्रमुख समितीमध्ये असेल.
३२ कोटी ५० लाखांची तरतूद
लम्पी स्कीन आजार राज्यात १२६ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. या पशुधनासाठी मदतीबाबत कोणतेही निकष नव्हते. या बाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार राज्य सरकार (Lumpy) मदत देणार आहे. यासाठी ३२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.