Facts About Lumpy Disease, In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान आणि हरियाणा राज्यात पशुपालकांना नाकीनऊ आणणाऱ्या लंपी (Lumpy) या त्वचारोगाचा महाराष्ट्रातही फैलाव होत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये देखील घबराहट निर्माण झाली आहे. वाढत्या प्रादुर्भावाबरोबर या रोगाला घेऊन काही अफवाही पसरत आहेत. राजस्थानातील अनेक गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आता पसरत आहे. परिणामी शहरी भागातील दूध पुरवठ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे. मात्र, लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासूनही माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.

लम्पी हा एक त्वचा रोग असून यामुळे जनावरांचे डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीमध्येच या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा दूध उत्पादनावर परिणाम झाला असला तरी दूध उकळून पिल्यावर कोणताही धोका राहणार नाही.

धार काढताना काळजी घ्या

लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असला तरी त्याचा माणसांना काही धोका नाही. मात्र, लम्पीग्रस्त (Lumpy) जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. शिवाय या जनावरांच्या दूधापासूनही काही धोका नाही. पण अशा जनावरांचे दूध उकळून पिले तर अधिक चांगले असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने दिला आहे.

काय घ्यावी काळजी ?

लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची (Lumpy) आवश्यकता आहे.

१)बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
२)निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
३)गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.
४)रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
५)बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
६)गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात.
७)बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी.
८)फवारणीसाठी 1 टक्के फॉर्मलीन किंवा 2 ते 3 टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल 2 टक्के यांचा वापर करावा
९)या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
१०)मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *