Lumpy : सावधान ! महाराष्ट्रातही ‘लम्पी’ चा शिरकाव; काय घ्याल काळजी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : गुजरात, राजस्थानात धुमाकूळ घालणाऱ्या ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या रोगाने महाराष्ट्रातही एंट्री केली आहे. पुण्यात पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कोपरे मांडवे (ता. जुन्नर) येथील ८ गायी आणि बैलांना लम्पी स्कीन रोगाची लागण झाली आहे. यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून, लगतच्या असलेल्या अकोले (जि. नगर) येथे देखील बाधित पशुधन होते. यामुळे आता पशुधनाची देखील तपासणी आणि तातडीचे उपचार सुरू करण्यात आले आहे.

८ जनावरे बाधित

या बाबतची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘नगर जिल्हा सीमेजवळील जुन्नर तालुक्यातील मांडवे गावात लम्पी त्वचा रोग आढळला. नगरमधील अकोले तालुका यापूर्वी बाधित होता. या तालुक्यातून प्रादुर्भाव झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून, कोपरे मांडवे (ता. जुन्नर) येथील ८ जनावरे बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आजाराचा फैलाव वाढू नये यासाठी परिसरातील एक किलोमीटरच्या परिघातील सर्व पशुधनांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर परिसरातील जनावरांचे बाजार बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या आजाराचा फैलाव वाढू नये यासाठी पशुधनाचा बाजार बंद करणे, वाहतूक रोखणे आणि लसीकरण यासारखे खबरदारीच्या उपाययोजनांचे टप्पे सुरू केले आहेत. या प्रादुर्भावामुळे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद बाधित गावांचा दौरा करणार आहेत.

आजाराची लक्षणे

हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. सुरुवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेन्द्रिय इ. भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात. निमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा होऊ शकते.
अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.

प्रतिबंध

1)निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत.
2)प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावरांवर तसेच गोठ्यात डास, माश्या, गोचीड इ.चे प्रमाण कमी करण्यासाठी यासाठीच्या आवश्यक औषधांची फवारणी करावी.
3)गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
4)साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी.
5)जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी.
बाधित क्षेत्रात गाई म्हशींची विक्री, पशू बाजार इ. बंद करावे.
6)बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करत असताना किंवा रोग नमुने गोळा करत असताना पीपीई किटचा वापर करावा. हात धुऊन घ्यावेत. तपासणीनंतर सर्व साहित्य निर्जंतुक करावे.
7)बाधित परिसरात स्वच्छता करावी. निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून परिसर निर्जंतुक करावा. याकरिता १ टक्का फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराइट याचा वापर करावा.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *